पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘मयुरपंख' : मराठी कवितांचा हिंदी अनुवाद


 दक्षिण महाराष्ट्रातील बहुप्रसव कवयित्री शैला सायनाकर यांनी गेले दशक आपल्या सातत्यपूर्ण काव्यलेखनाने आपलेसे केले आहे. शब्दांची काटकसर व भावांची कलाकुसर हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य. त्यांची समग्र कविता सल वागवत विकसित होत आली आहे. रक्तकमळांचे रान' (१९९३) पाणडोह (१९९७) सखी (२000) सारख्या काव्यसंग्रहातून त्यांची कविता शब्दांकडून मिथकांकडे वाटचाल करताना दिसते. त्यांचे मन भावुक नि हात कलात्मक. त्या स्वत: आपल्या कविता सुंदर रेखाचित्रांनी सजवतात. त्यांच्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ जसे त्यांचे असते तशी आतली रेखाटनेही!

 या कवयित्रीच्या मराठी कवितांचा हिंदी अनुवाद आहे ‘मयूरपंख'. अजीम यांनी तो केला आहे. शैला सायनाकरांची मराठी कविता संस्कृतधार्जिणी. तिचा अनुवाद मात्र संस्कृत, उर्दू मिश्रित भाषेत. यातील अनुवादाच्या अनेक प्रयोगांमुळे त्याला मोरपंखी सौंदर्य प्राप्त झाले आहे.

 कवितेचा अनुवाद करणारा अनुवादक कविमनाचा असेल तरच कवितेचा अनुवाद प्रभावी होतो तसा अनुभव येथे येतो.

 ‘मयूरपंख' हा शैला सायनाकर यांच्या काव्यसंग्रहातील निवडक कवितांचा अनुवाद होय. शिवाय त्यात तितलियाँ ‘साँज ढले की बेला', 'बरसात' सारख्या स्वतंत्र रचनांचेही अनुवाद आहेत. त्रेपन्न कवितांचा हिंदी अनुवाद वाचत असताना काही ठिकाणी तो चपखल झाला; तर काही ठिकाणी अनुवादक व्याकरणिक अनुवादाच्या चक्रव्यूहात गुंतल्याचे जाणवते. कवितेचा अनुवाद लक्ष्यभाषेतील वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून व्हायला हवा; तर तो अधिक भावतो, भिडतो. अनुवादकांनी शब्द प्रामाण्यापेक्षा आशयगर्भ अनुवाद करायला हवा. श्रेष्ठ अनुवादाची कसोटी भावप्रामाण्य असायला हवी. ती असती तर हा अनुवाद अधिक उंचावला असता. ‘अनगढ राहों पर', “यह दुस्तर घाट', ‘मयूरपंख' सारख्या रचनांचे अनुवाद अनुवादाच्या विभिन्न रंगछटांचे, शैलींचे साक्षी होत. मिथक धारण करणाच्या कवितांच्या अनुवादात अनुवादकाने रूपांतर शैली वापरली असती तर ते अनुवाद मूळ कवितेइतके भावगर्भ होते.

वेचलेली फुले/१०८