पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वडील विठ्ठल कृष्णाजी गवळी मूळचे रत्नागिरीच्या खेडचे. म्हणून ते खेडकर झाले. त्यांनी गवळी समाजाची नियमावली त्या काळी तयार केली आहे. समाजजीवनाचा अभ्यास करू इच्छिणा-यांना ही नियमावली वाचन व अभ्यास दोन्हीसंदर्भात पर्वणी ठरावी. एकोणिसाव्या शतकातील ही नियमावली. तीत म्हटले आहे ‘मुला-मुलींचे लहानपणी लग्न करू नये, एक नवरा-बायको जिवंत असताना सबळ कारणाशिवाय दुसरा-दुसरी करू नये. आपल्या जातीच्या लोकांनी लंगोटीऐवजी धोतर किंवा पंचा नेसण्याची चाल पाडावी. आपण लंगोटी नेसतो म्हणून आपणास नीच मानतात...आपली जात भगवद्गीता अध्याय १८ व ४४ या प्रमाणे वैश्य...परंतु या लंगोटीच्या योगाने आपणास चौथ्या म्हणजे शूद्रांच्या वर्गातले मानतात.

 समाजजीवनाच्या या नि अशा किती तरी पैलूवर नवा प्रकाश पाडणारा हा संशोधनात्मक चरित्र ग्रंथ. पूर्वसुरींच्या वैचारिक धारणेचा अभ्यास करण्यासंदर्भात ऐतिहासिक दस्तऐवज बनून समोर येतो. डॉ. विश्राम रामजी घोले व डॉ. रघुनाथराव खेडकर यांच्या परिवारांची ही साद्यंत कहाणी केवळ त्या परिवाराची न राहता तत्कालीन समाजसुधारणेचे व परिवर्तनाचे एक चलचित्र बनून आपल्या डोळ्यांसमोर प्रभावीपणे उभे राहते. आज धर्मनिरपेक्ष समाजाची घडण व्हावी म्हणून धडपड करणाच्या एकोणिसाव्या शतकात पाऊणशे वर्षांपूर्वीचे जाती धर्मांनी करकचून बांधलेले जीवन वाचणे, अभ्यासणे, यासाठी मनोज्ञ ठरते की, त्या प्रतिकूल काळात महात्मा फुले, डॉ. विश्राम घोलेंसारखे समाजधुरीण नवसमाज आकारावा, शिक्षित, उन्नत व्हावा म्हणून अविश्रांत धडपडत होते. हे पाहिले की वाटते त्यांच्या शर्थीची दाद द्यावी व आजच्या रक्ताळणाच्या समाजजीवनात जाती धर्माचे निर्वैर प्रवाह वाहावेत, म्हणून नव्या संदर्भात शर्थीचे प्रयत्न करावेत.


• सार्वजनिक सत्यधर्माचे उपासक डॉ. विश्राम रामजी घोले

 आणि त्यांचा परिवार (चरित्र)
 लेखिका - डॉ. अरुणा ढेरे,
 प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे.

 पृष्ठे - २८२  किंमत - १४0 रुपये

♦♦

वेचलेली फुले/१०१