सार्वजनिक सत्यधर्म उपासक डॉ. विश्राम घोले
डॉ. अरुणा ढेरे यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्माचे उपासक डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार'. या शीर्षकाचा संशोधनपर समाजचरित्र ग्रंथ लिहून डॉ. धनंजय कीर, डॉ. य. दि. फडके यांच्यासारख्या संशोधक चरित्रकार परंपरेचा सार्थ विकासच केला असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. डॉ. विश्राम रामजी व त्यांचे जावई डॉ. रघुनाथ खेडेकर यांच्या चरित्र लेखनाच्या माध्यमातून १८३३ ते १९३0 या जवळजवळ एका शतकातील महाराष्ट्रातील सामाजिक घडणीचा व परिवर्तनाचा अप्रकाशित इतिहास या ग्रंथात आहे. ग्रंथास जोडलेली संदर्भ सूची, परिशिष्टे लेखिकेच्या श्रमाची साक्ष देतात. ‘विस्मृतिचित्रे' च्या माध्यमातून त्यांनी अनेक अप्रकाशित स्त्री चरित्रे मराठी सारस्वतास दिली. त्यांच्या या संशोधनपर चरित्र ग्रंथांमुळे चरित्रलेखनाचा नवा वस्तुपाठ निर्माण झाला आहे. महात्मा फुले व सत्यशोधक चळवळींसंबंधाने नवा साधन ग्रंथ म्हणूनही या चरित्र ग्रंथाचे वेगळेपण व महत्त्व आहे.
डॉ. विश्राम रामजी घोले हे महात्मा जोतिबा फुले यांचे सहकारी. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष. गवळी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाने स्वकर्तृत्वावर कुशल शल्यक्रिया चिकित्सक विशारद म्हणून लौकिक मिळवला. वडिलांप्रमाणे प्रारंभी ब्रिटिश पलटणीत डॉक्टर म्हणून उमेदवारी केली. ब्रिटिशांनी मोडून काढलेल्या १८५७ च्या बंडाचे ते साक्षीदार! पण आपण सरकारी सेवेत असल्याने याबद्दल अवाक्षर काढणे त्यांनी गैर मानले. घरात व समाजात सतत विरोध असतानाही त्यांनी सामाजिक सुधारणांची पाठराखण केली. मुलींच्या शिक्षणासाठी हुजूरपागा शाळेची स्थापना, ब्राह्मणेत्तर समाज उन्नतीसाठी स्थापन केलेल्या 'डेक्कन असोसिएशन फॉर एज्युकेशन अपंग मराठाज्’ चे पदाधिकारी. कोकणातील आडगावी उद्योगशाळेची स्थापना, डॉक्टरी व्यवसायात एकोणिसाव्या शतकातील समाजजीवनाच्या (जाती-धर्मकेंद्री) पार्श्वभूमीवर ‘रोगी' हीच जात मानून सेवा, सर्व प्रकारच्या सामाजिक संस्था, उपक्रमांना सहकार्य, अर्थसाहाय्य, बांधिलकीने काम करण्यांना ‘स्वजन' मानणारे उदारमतवादी, सत्यशोधक समाजानंतर ‘सार्वजनिक सत्यधर्माची' स्थापना, प्रार्थना समाजी, एकेश्वरवादी