पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 खेड्यात खरीखुरी सुधारणा झाली का? काडीइतकीदेखील नाही. शिक्षण हे पाणी! ते समाजवृक्षाच्या मुळाशी घातले की, काम झाले असे मला वाटते! पण या वृक्षाच्या मुळाला लागलेली जातिद्वेषाची, विषमतेची आणि पैशाच्या गुलामगिरीची कीड त्याला थोडीच वाढू देणार? ही कीड मेली पाहिजे - मारली पाहिजे! म्हणणाऱ्या खांडेकरांमधील समाजचिंतकाच्या मनातील खेड्यातील समाजाविषयी तळमळ वाचकास अंतर्मुख करते. खेड्यातील दुरवस्थेचे झालेले दर्शन वि. स. खांडेकरांनी आपल्या अनेक कथा, कादंबरी, चित्रपट कथा इत्यादींतून तीव्रतेने व्यक्त केले आहे, त्याचा प्रत्यय त्यांना कोकणात शिरोडा येथे शिक्षक म्हणून कार्य करताना कोकणच्या झालेल्या दर्शनात आलेला होता.
धर्म
 वि.स.खांडेकर स्वतः निधर्मी, नास्तिक होते. समाज धर्मनिरपेक्ष असावा, अशी त्यांची धारणा होती, ती धर्म माणसा-माणसांत भेदभाव करतो म्हणून. माणुसकी हाच खरा धर्म मानणारे खांडेकर सांगतात, “हृदयाने हृदयाला ओळखणे हाच जगातील सर्वश्रेष्ठ धर्म असतो... धर्म पागोट्यांत अगर बाराबंदीत नाही; धर्म सोवळ्याने शिजवलेल्या अन्नात नाही, महारांची सावली पडू नये म्हणून रस्त्यावर उड्या मारीत जाण्यातही धर्म नाही. जगातील प्रत्येक जीव आपल्या प्रमाणेच आहे, सुख-दुःख, मान-अपमान, नीती-अनीती या सर्वांची त्यालाही आपल्याइतकीच गरज आहे. दुस-याच्या अज्ञानाचा, दारिद्र्याचा अगर पारतंत्र्याचा फायदा घेऊन त्याच्या जीवावर आपण गबर होणे पाप आहे, हे ज्याला कळते आणि थोडेफार वळते तोच खरा धर्मनिष्ठ! देव, धर्म, कर्मकांड, पोथीनिष्ठा, उच्च-नीचता या सर्व माणुसकीला कलंक लावणाऱ्या गोष्टी असल्याने खांडेकरांनी जागोजागी अशा बाबींचा विरोध करून त्या निषेधार्ह मानल्या आहेत.
दारिद्र्य व अज्ञान

 वि. स. खांडेकर यांचे बालपण व शिक्षण सांगली, पुणे अशा पांढरपेशा व मध्यमवर्गीयांच्या शहरात झाले. शिक्षक म्हणून कोकणात गेल्यावर त्यांनी खरा भारत पाहिला - अनुभवला. दारिद्र्य काय असते? अज्ञानामुळे माणसं अगतिक होऊन अंधश्रद्धेचे बळी कशी ठरतात, हे त्यांनी अनुभवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या विश्वात दोन जगे आहेत. एक गरिबांचे अन् दुसरं श्रीमंतांचे. समाजातील हे दोन ध्रुव आहेत. गरिबांचे हलाखीचे जीवन पाहून विफल होणारे खांडेकर प्रश्न करतात, “ही कष्ट करणारी माणसे किती हलाखीचे जीवन जगत आहेत! कदाचित पिढ्यानपिढ्या हे असेच चालत आलेले असेल!

वि. स. खांडेकर चरित्र/९३