पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकरण चौथे
समाजचिंतक खांडेकर : माणूसपणाचा शोध

 माणूस घडतो वाचनाने, तसाच तो पूर्वसूरींच्या प्रभावानेही आकारत असतो. वि. स. खांडेकरांचा साहित्यिक पिंड विविधांगी वाचनाने घडला. हे वाचन भारतीय होतं, तसं पाश्चात्त्यही. त्यांच्या साहित्यातील आशयात भारतीय प्राचीन साहित्य व पूर्ववर्ती लेखकांच्या साहित्यसंपदेचा प्रभाव होता तर कलेवर इंग्रजी साहित्याचा. विचार म्हणून माणुसकी, समाजवाद, गांधीवाद, मार्क्सवाद यांवर त्यांची भिस्त होती. हरी नारायण आपटे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, महात्मा गांधी, कार्ल मार्क्स, स्टीफन झ्वाइग, तुर्गनेब, चेकॉव्ह असा त्यांच्या वाचन व प्रभावाचा पैस असल्याने विषमता, दारिद्रय, अज्ञान, समानता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, समाजवाद हे त्यांचे चिंता आणि चिंतनाचे विषय असायचे. हे चिंतन पुस्तकांच्या प्रस्तावना, वैचारिक लेख, पात्र संवाद, कथाविस्तार इत्यादींमधून प्रकट होत राहतं. दलित, शोषित स्त्रिया, सर्वांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आस्था भरलेली होती. या आस्थेपेक्षा महात्मा गांधींच्या प्रभावाने ते शिरोडे खेड्यात जाऊन शिकवू लागले. ‘पावलापुरता प्रकाश' या न्यायानं त्यांनी ध्येयवाद, नैतिकता, सदाचार, सभ्यता इत्यादी जपली.
खेडे

 'कांचनमृग' कादंबरीत त्यांच्या खेड्याकडील आस्थेचे दर्शन घडते. ‘शहराची सुधारणा करून देशाची उन्नती करणे हा कांचनमृग आहे. खेडी सुधारतील तेव्हाच देश सुधारेल. शहरे हिंदमातेची वस्त्रे मानली, तर खेडी ही तिची हाडे आहेत. ही हाडे एकसारखी झिजत असताना नुसती सुंदर वस्त्रे परिधान करून तिच्या मुखावर तेज येणार नाही', या विधानातून त्याचा प्रत्यय येतो. ‘उल्का' तर त्यांची ध्येयवादी कादंबरी. तीमध्ये खांडेकरांनी स्त्रीजीवन, त्याग आणि आर्थिक विषमतेचे हृदयद्रावक चित्र उभे केले आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/९२