पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्या रंजक करण्यासाठी त्यांनी प्रेम, प्रणयही चित्रित केला; पण ते त्यांचं लक्ष्य नव्हतं. चित्रपट यशस्वी करण्याचे साधन म्हणून, पट रंजक व्हावा म्हणून केलेला तो प्रयत्न असायचा. आधारित कथा मात्र त्यांनी निखळ मनोरंजनासाठी लिहिल्या. पटकथांमध्ये चारित्रिक, वैचारिक, भावनिक, सामाजिक द्वंद्व ठरलेले. अधिकांश कथा शोकात्म होत्या, तर काही सुखान्तही. द्वंद्वात सुष्ट, सतुपक्षांची सरशी ठरलेली. वि. स. खांडेकरांनी आपल्या पटकथा मेलोड्रामा, फँटसी, सटायर म्हणून लिहिल्या. कथा जशी घडली तशी लिहिण्याचा त्यांचा प्रघात होता. अपवाद म्हणून एखादी पूर्वदीप्ती शैली विकासाची कथाही आढळते. त्यांच्या पटकथा एक विशिष्ट खांडेकरी वळणवाट घेऊन येतात, विकसित होतात.
 चित्रपटातील खांडेकरांचे संवाद छोटे, सहज आहेत. त्यांत विचार, विवेक, सिद्धान्त आपसूक असतातच. त्यांची साहित्यातील सुंदर शब्दकळा इथेही भेटते. अनुप्रास, उपमा हा संवादाचा अविभाज्य भाग असतो. संवादात खोच, कोपरखळी, कोटीही असते. संवादातून कथाविकास, चरित्रचित्रण होत राहतं. नाटककाराचा मूळ पिंड असलेले खांडेकर कथेत संवादातून चपखलपणे नाटकीय प्रसंगांची पेरणी करीत ती खुलवित राहतात.
 प्रसंगानुरूप गीत, गाण्यांची रचना करण्यात वि. स. खांडेकर वाकबगार आहेत. प्रसंगानुकूल गीतरचना हे त्यांच्या चित्रकथांचं वैशिष्ट्य. त्यांची गीते प्रेम, प्रणय, निसर्ग, भाव वर्णन करीत विकसित होतात. गीतं लयबद्ध असतात तशी नादमधुरही. ती छंदयुक्त अधिक. काही कथांत त्यांनी अन्य प्राचीन व समकालीन कवींच्या रचनांचा उपयोग करण्याचा द्रष्टेपणा दाखविला. या रचनेने त्यांचे चित्रपट बोधगम्य व रम्य होण्यास साहाय्य झालं आहे.

 वि. स. खांडेकरांचे साहित्यिक, सामाजिक लेखन पाहिले की, रशियन कथालेखक मॅक्झिम गॉर्कीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दोघांच्या जीवन व साहित्यात आश्चर्यकारक साम्य दिसून येते. दोघांना घरच्या आधाराअभावी अल्पवयात जीवनसंघर्ष करावा लागला. दोघांना गरिबांचा आरंभीपासून कळवळा. शालेय शिक्षण दोघांचे जुजबी; पण वाचन जबर. शिकणं हाच दोघांपुढील वाचण्याचा एकमेव मार्ग. दोघं विचारानं समाजवादी, धर्मनिरपेक्ष. दोघेही साहित्यकार. दोघांनी कथा, कादंबच्या आत्मकथा, नाटकं लिहिली. दोघांनी टोपणनावांनी लिहिले. खांडेकरांनी कुमार, आदर्श, एक शिक्षक नावांनी. गॉर्की हेच त्यांचे टोपणनाव.

वि. स. खांडेकर चरित्र/९०