पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'शांती शब्दाने नाही, त्यागानेच प्राप्त करता येते.' असा संदेश देणारा हा बोलपट. सन १९४६ साली तो मुंबईच्या रॉक्सी सिनेमात प्रदर्शित झाला. १२२ मिनिटांचा हा कृष्णधवल चित्रपट मास्टर विनायकांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट म्हणून त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. 'प्रफुल्ल चित्र'च्या बोलपटासाठी पंडित इंद्र यांनी गीतं लिहिली होती. याला वसंत देसाईंचं संगीत लाभलं होतं. शांता आपटे, लता मंगेशकर यांच्या यात भूमिका होत्या. माधव बुलबुले यांचा कॅमेरा यावर फिरला होता.
 तसा हा पौराणिक चित्रपट. खांडेकरांनी कृष्ण-बलराम संवादाच्या आधारे याची पटकथा तयार केली होती. मास्टर विनायकांचे हे पहिले व शेवटचे पौराणिक चित्र. प्रेम-अदीब यांनी कृष्णाची, दादा साळवी यांनी बलरामाची, ईश्वरलालनी अर्जुनाची, तर शांता आपटे यांनी सुभद्राची भूमिका केली होती. सुभद्राच्या विवाहावर बेतलेलं ‘सुभद्रा'चं कथानक. सुभद्राचा विवाह कुणाशी करायचा, यावर कृष्ण-बलराममध्ये वाद होतो. कृष्ण अर्जुनास पसंती देतो, अशी सर्वपरिचित कथा घेऊन येणारा पट. यास युद्धाची झळ लागली. या चित्रपटातील शांता आपटे व लता मंगेशकर यांनी गायलेलं 'मैं खिली-खिली फुलवारी' हे दुर्मीळ द्वंद्वगीत लोकांना फार आवडलं होतं.
 मास्टर विनायकांनी वि. स. खांडेकरांच्या कथाना मूर्त रूप दिलं. ते खांडेकरांसारखेच ध्येयवादी व संवेदनशील. मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे देशप्रेम धगधगत राहिलं. त्यांना मृत्यू आला तो राष्ट्रध्वज पाहतच. स्वातंत्र्यदिन पाहिला... ते त्यांचं एक स्वप्न होतं... देश स्वतंत्र झाल्यानंतरचा पहिला स्वातंत्र्यदिन... त्यांची विष्णुपंत जोगांनी सांगितलेली आठवण मोठी हृद्य आहे... मास्टर विनायक आजारी होते. तरी काठी टेकत स्टुडिओत आले... स्वतः ध्वजारोहण केलं... ‘सुभद्रा'चा फलक लावला... कोण आनंद होता त्यांच्या चेह-यावर...! विष्णुपंतांना म्हणाले, 'अहो, स्वराज्य मिळालं, बरं का! आता बघा मी कसे बोलपट काढतो ते! आतापर्यंत ही इंग्रजांची बंधनं सांभाळून बोलपट काढायला लागायचे. आता जे मला लोकांना खरोखर दाखवायचं आहे ते मी दाखवू शकेन! असं काही दाखवीन की लोक हरखून गेले पाहिजेत!

 पण ते घडायचं नव्हतं, १९ ऑगस्ट, १९४७ लाच त्यांची प्राणज्योत मालवली आणि खांडेकरांच्या पटकथांना कलात्मक साज चढवून त्यात भावनांचा गोफ गुंफणारा कलाकार हरपला. त्यानंतर खांडेकरांचे दोन हिंदीपट आले; पण त्यांना ‘विनायक टच' काही लाभला नाही.

वि. स. खांडेकर चरित्र/८४