पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या नि अशा अनेक प्रयत्नांमुळे 'अमृत' ही खांडेकरांची श्रेष्ठ पटकथा म्हणून प्रसिद्ध पावली. या कथेची सारी पार्श्वभूमी ग्रामीण होती. मराठी ग्रामीण चित्रपट विकासाच्या प्रारंभिक पाऊलखुणा उठविण्याचे श्रेय वि. स. खांडेकरांच्या या कथेस दिलं जातं. 'अमृत' कथेतील नाट्यमयता लक्षात घेऊन बालमोहन नाटक मंडळींनी खांडेकरांकडे ‘अमृत'च्या कथेच्या आधारे नाटक लिहिण्याचा प्रस्ताव ठेवला होता; पण तो काही फळास आला नाही.
 ‘कोकण आणि दारिद्र्य यांची अभेद्य सांगड या चित्रानं आकाराला आलेली दिसते... यात विनायकांनी आपल्या दिग्दर्शनातील सर्व कसब पणास लावलेले दिसते. खांडेकरांनी 'नव्या युगाची नव्या जगाची नौबत वाजे रे' सारख्या समूहगीताची योजना कथेच्या शेवटी करून ‘अमृत' हा बोधपट असल्याच्या धारणेवर एका अर्थाने शिक्कामोर्तबच केले होते. या चित्रपटातील बाबूराव पेंढारकरांनी रंगविलेली कृष्णा चांभाराची भूमिका प्रभावी होती. ललिता पवारनी साकारलेली सीता, साळवींचा बाप्पा या भूमिकाही अशाच. दृश्य चित्रणातील कलात्मकतेमुळेही त्या काळी ‘अमृत'चा मोठा गाजावाजा झाला होता. कोकण नि विशेषतः शिरोडा हा खांडेकरांचा नर्मबिंदू, त्याचं कारण तिथलं अज्ञान आणि दारिद्र्य. कोकणचं हे वास्तव खांडेकरांच्या डोक्यात सतत थैमान घालत राहिले. या मंथनातून निर्माण झालेलं कथारत्न म्हणजे 'अमृत'. गरिबी-श्रीमंतीचा 'संगम' ‘रक्तापेक्षा मायेचे नाते मोठे', 'विषमता हे देव नसण्याचे लक्षण', ‘गरिबांच्या सेवेसाठी खेड्यात चला', इत्यादी सुभाषिते घेऊन सत्पक्षाचे समर्थन करणारी सोज्ज्वळ कथा असं 'संगम' पटकथेचं वर्णन करता येईल.
 आजवरच्या खांडेकरांच्या कथांच्या तुलनेत ‘संगम'ची कथा काहीशी दीर्घ, गुंतागुंतीची व अनेक उपकथांचा संगम साधणारी. ‘सब मर्ज की एक दवा न्यायाने खांडेकरांनी 'संगम' कथेद्वारे अनेक प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेमकथा, संघर्षकथा, अशा अनेकांगांनी विकसित होणारी ‘संगम' ही आदर्शवादी कथा. गरिबी आणि श्रीमंतीच्या संगमानेच समाजवाद अवतरेल, असा आशावाद ही कथा प्रेक्षकांच्या मनात रुजवते. 'अमृत' कथेप्रमाणे इथंही ग्रामीण पार्श्वभूमी आहे; पण जोडीला शहरही. कथा,पात्र,विचार,प्रदेश सर्वांचा संगम साधणारी ही कथा खांडेकरांच्या समन्वयवादी वृत्तीचा ठळक पुरावा म्हणून आपल्यासमोर येते.

 ‘अमृत'प्रमाणेच 'संगम' मराठीबरोबर हिंदीतही रूपांतरित (Dub) करण्यात

वि. स. खांडेकर चरित्र/७३