पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विनायकांनी उघडली असं म्हटलं गेलं, ते खरं आहे. या साऱ्या दृश्यांत कल्पना विनायकांची असली तरी ती साकारली मात्र पांडूरंग नाईक यांच्या द्रष्ट्या कॅमेऱ्यामुळे, हे विसरून चालणार नाही.
पाकळ्या या गळाल्या पाहुनि ‘ज्वाला'
 ‘छाया'नंतर वि. स. खांडेकरांचा दुसरा बोलपट होता ‘ज्वाला'. तोही मराठीबरोबर हिंदीत ध्वनिमुद्रित करण्यात आला होता. चंद्रमोहन' या गाजलेल्या हिंदी अभिनेत्यासाठी ज्वाला'ची कथा लिहिली गेली. 'ज्वाला'चे कथानक शेक्सपिअरच्या 'मॅकबेथ' नाटकावर आधारित होते. चंद्रमोहन हिंदीभाषी होते. त्यांच्या सदोष उच्चारांमुळे तो मराठी प्रेक्षकांची पकड घेऊ शकला नाही. खांडेकरांच्या मूळ कथेत व्यावसायिक तडजोडीतून अनेक बदल करण्यात आले. या कथेच्या यशापयशाबद्दल बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक व वि. स. खांडेकरांनी लिहिलं आहे. मोठ्या खर्चाचा (Big Budget) अपयशी चित्रपट असं याचं वर्णन करता येईल. ज्वाले'मध्ये 'हंस'चे पंख होरपळले, अशी खोचक प्रतिक्रिया आचार्य अत्रे यांनी त्या वेळी दिली होती. या चित्रपटनिर्मितीस कोल्हापूर संस्थानाने माणसे, साहित्य, रिसाला (घोडदळ), आदी देऊन मोठं साहाय्य केलं होतं. चित्रपटासाठी भव्य सेटची निर्मिती करण्यात आली होती. मराठी चित्रपटसृष्टीत काही भव्य-दिव्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेने मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांनी मोठे कष्ट घेतले; पण परस्पर समन्वय नसल्याने त्यात अपयश आले. ‘ज्वालापूर्वी मराठी चित्रपटांची श्रेयनामावली (Titles) इंग्रजीत असायची. या चित्रपटाने मराठी श्रेयनामावलीची प्रथा सुरू केली. ही सूचना स्वातंत्र्यवीर सावरकरांची. 'हंस' भेटीत त्यांनी ती व्यक्त केली होती. स्वतंत्र संगीत दिग्दर्शक (Arranger) मुक्रर करण्याची परंपराही याच चित्रपटाने सुरू केली. १६० मिनिटांचा हा कृष्णधवल बोलपट. यामध्ये खांडेकरांनी मेलोड्रामाऐवजी 'फैंटसी'चा प्रयोग करून कथानकात रंगत आणली होती; पण सदोष निर्मितीमुळे बोलपट पकड घेऊ शकला नाही. हा एक विचारप्रधान बोलपट होता.

 वि. स. खांडेकरांनी ‘ज्वाला'च्या कथेद्वारे माणसाने षड्रिपूमुक्त असण्याच्या आवश्यकतेवर भर दिला होता. पाकळ्या या गळाल्या पाहुनि ज्वाला' हे मंगलची भूमिका निभावणाऱ्या रत्नप्रभेने गायलेले गीत त्या वेळी गाजले होते. हा काळ गायकीचा होता. अभिनेत्रीची निवड सौंदर्याबरोबर गळ्याच्या आधारावर व्हायची. पार्श्व आवाजाची (Play Back) परंपरा त्या वेळी नव्हती. तत्पूर्वी ‘धर्मवीर'मधील रत्नप्रभाची गाणी गाजल्याने

वि. स. खांडेकर चरित्र/६६