पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांच्या उल्का', 'दोन ध्रुव'सारख्या रचना, आचार्य अत्रे यांची ‘साष्टांग नमस्कार’,‘भ्रमाचा भोपळा' सारखी गंभीर व सामाजिक समस्याप्रधान नाटके यांचा प्रभाव व संस्कार घेतलेली ही मंडळी. मास्टर विनायक तर पूर्वाश्रमीचे शिक्षकच. शिक्षणक्षेत्राचा निरोप घेऊन चित्रपटसृष्टीत जाताना आपल्या निरोपाच्या भाषणात मास्टर विनायक आपल्या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले होते, ‘माझा शिक्षकाचा पेशा बदलला जाणार नाही. यापुढे काळ्या फळ्याची जागा रुपेरी पडदा घेईल. त्यामुळे काही नवं करण्याच्या उद्देशाने त्यांनी वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे यांच्याशी संपर्क साधला. हे दोन्ही लेखक असले तरी ते मुळात शिक्षकच होते. आचार्य अत्रे या वेळी ‘उद्याचा संसार' नाटक लिहिण्यात व्यग्र होते; त्यामुळे ‘हसं'नी वि. स. खांडेकरांशी त्यांचे सांगलीचे मामेभाऊ श्री. बाबूराव माईणकरांमार्फत संपर्क साधला. ही सप्टेंबर, १९३५ ची गोष्ट. निरोप पोहोचला तरी आपणास बोलपटाची कथा लिहिणे जमणार नाही, म्हणून वि. स. खांडेकरांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पुढे मास्टर विनायकांनी दि. १२ डिसेंबर, १९३५ रोजी पत्र लिहून खांडेकरांना गळ घातली. त्यात लिहिले होते, ‘आपणास कळले असेलच की, आम्ही कोल्हापूर सिनेटोन सोडली व मी व बाबूराव पेंढारकर दोघंही नवीन कंपनी काढणार आहोत. जवळजवळ नक्की झाले आहे माझी इच्छा - फार दिवसांपूर्वीची होती की, आपले कथानक screen वर यावे. याच दरम्यान बाबूराव पेंढारकरांनीही खांडेकरांनी लिहिले होते. उत्तरादाखल खांडेकरांनी ‘चांभाराचा देव' कथेवर आधारित 'अमृत' ही बोलपटयोग्य कथा सुचविली. ती खर्चिक होती. तिचे बाह्यचित्रण (Outdoor shooting) कोकणात करणे गरजेचे होते. कंपनी नवीन. एवढा भार सोसणं अशक्य होतं. मग बाबूरावांनी ३१ डिसेंबर, १९३५ रोजी उत्तरादाखल वि. स. खांडेकरांना लिहिलं होतं. त्यातून ‘हंस'त्रिमूर्तीची चित्रपट निर्मितीमागील भूमिका स्पष्ट होते.

मंगळवार पेठ,

कोल्हापूर

ता.३१-१२-३५

कृ. सा. न. वि. वि.

 आपले ता. ३० चे पत्र वाचले. आपण लिहिता त्याप्रमाणे अस्पृश्यता, मद्यपान निषेध व आर्थिक विषमतेचे दुष्परिणाम या कथानकात दाखविता येतील व त्याबद्दल मी - विनायक आज रात्री विचार करून आपणास उद्या अगर परवा पत्राने कळवीत आहे. आज विनायकचे Songs of Life

वि. स. खांडेकर चरित्र/६३