पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकरण तिसरे
पटकथाकार खांडेकर : मराठीचे मॅक्झिम गॉर्की

 आजवर वि. स. खांडेकर हे साहित्यिक म्हणून सर्वश्रुत आहेत; पण त्यांनी मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपट क्षेत्रांत पटकथा, संवाद, गीतलेखन करून जे भरीव असे योगदान दिले आहे, ते मराठी साहित्य अभ्यासकांनाही अपरिचित राहिले आहे. त्यांच्या पटकथा आजवर उपलब्ध नसणे, हे त्याचे प्रमुख कारण होते. त्या आता हाती आल्याने चंदेरी दुनियेतील खांडेकरांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेणे शक्य झाले आहे. सर्वस्वी अस्पर्शित या क्षेत्राच्या माहितीमुळे खांडेकराच्या जीवन व कार्याला समग्र रूप येईल, असे वाटल्यावरून ‘पटकथाकार खांडेकर' इथे उभे करण्याचा प्रयत्न आहे. ते वाचले की, आपल्या लक्षात येईल की, वि.स.खांडेकर हे मराठीतील मॅक्झिम गॉर्की होते. गॉर्कीप्रमाणे त्यांनी मानवी जीवनाचा सर्वांगी वेध घेण्याचा प्रयत्न केला होता.
पवित्र गुन्ह्याची कथा : 'छाया'

 चित्रपटसृष्टीत वि. स. खांडेकरांचं येणं अगदी अनपेक्षित असं होतं. ‘क्रिकेटच्या कसोटी सामन्यात अनपेक्षितपणे एखाद्या नवख्या खेळाडूची निवड व्हावी तसं. दिग्दर्शक मास्टर विनायक, अभिनेते बाबूराव पेंढारकर व कॅमेरामन पांडुरंग नाईक यांनी 'कोल्हापूर सिनेटोन' कंपनीस रामराम ठोकून हंस पिक्चर्स' नावाची स्वतंत्र कंपनी सन १९३६ च्या प्रारंभी काढली. ही मंडळी ध्येयवादी होती. मराठी चित्रपटसृष्टीस नवं वळण द्यावं, असा त्यांचा ध्यास होता. तो काळ पौराणिक चित्रपटांचा होता. नवशिक्षित, मध्यमवर्गीय प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून ध्येयधुंद, उदात्त असं काही करण्याचा या मंडळींचा ध्यास होता. लक्ष्मीबाई टिळकांचं ‘स्मृतिचित्रे, साने गुरुजींची 'श्यामची आई', शरदचंद्र चतर्जीचे सारे साहित्य - विशेषतः 'देवदास', ‘श्रीकांत', 'चरित्रहीन'सारख्या कादंबऱ्या, वि.स.खांडेकर

वि. स. खांडेकर चरित्र/६२