पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो वि. स. खांडेकरांचा मनुष्यसंग्रह व पत्रव्यवहाराचा. वि. स. खांडेकर लेखक म्हणून आपणापुढे येतात ते १९१९ पासून. त्यांचं लेखन प्रकाशित होऊ लागल्यापासून त्यांचा समाजसंपर्क वाढला. सन १९२० पासून वि.स.खांडेकरांनी लिहिलेली व त्यांना इतरेजनांनी लिहिलेली पत्रे आढळतात. ‘दीपगृह'मध्ये संग्रहित आहेत ती फक्त वि. स. खांडेकरांनी इतरेजनांना लिहिलेली; पण खांडेकरांना इतरेजनांनी लिहिलेली शेकडो पत्रे विविध ठिकाणी पत्रसंग्राहक, चित्रपट, दप्तर, नियतकालिक, वृत्तपत्रे कार्यालय, साहित्यिक, पुराभिलेख, जुनी वृत्तपत्रे, कौटुंबिक पत्रसंग्रह यांत आढळून येतात. त्यातूनही खांडेकरांचं 'माणूस' म्हणून विलोभनीय व्यक्तिमत्व पुढे येतं.

 पत्रसंवाद हा वि.स.खांडेकरांच्या जीवनशैलीचा एक अभिन्न भाग होता. रोज येणाऱ्या टपालाची ते वाट पाहत. पोस्टमनविषयी त्यांना आस्था होती, हे साहित्यातून लक्षात येतं. येणाऱ्या प्रत्येक पत्रास उत्तर पाठवायचा त्यांचा प्रघात होता. आलेल्या पत्रावर उत्तर पाठविल्याची नोंद करण्याची त्यांची सवय दिसते. उत्तरे पाठविलेल्या पत्राची प्रत वा मुद्दे ते जपून ठेवत. वाचकांना उत्तर देत तशी संपादक, प्रकाशकांनाही किंवा समकालीन साहित्यिकांशी त्यांची दीर्घकाळ पत्रोत्तरी चालायची. सगळ्यांशी त्यांचे सबंध लेखकापलीकडे जाऊन मनुष्यकेंद्री होत. वि.स.खांडेकरांनी इतरेजनांना लिहिलेली केवळ १४५ पत्रे ‘दीपगृहात आली असली तरी त्यांनी शेकडो पत्रे लिहिली होती व तेवढीच त्यांना आली असावीत, असं संशोधनातून लक्षात येते. वि.वि.पत्कींच्या हाती सन १९७६ ला सुमारे २००० पत्रे आली होती, यावरूनही हे स्पष्ट होते. खांडेकरांची पत्रे म्हणजे जिव्हाळ्याचा संवाद असायचा. पत्रातील प्रांजळपण लक्षणीय होतं. भाषा संवादी होती. संबोधन व स्वनिर्देशातून खांडेकर पत्रलेखकाविषयीचा आपला आदर, प्रेम, स्नेह, संबंध, नाते व्यक्त करीत. पत्रात कौटुंबिक उल्लेख खुशाली असायची. प्रकृतीची कुरकुर अधिकांश पत्रात आढळते. प्रारंभी पत्र स्वतः लिहीत नंतर लेखनिक आले. पण स्वाक्षरी करीत ते १९७३ पर्यंत, म्हणजे दृष्टी जाईपर्यंत.

वि. स. खांडेकर चरित्र/६१