पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वि. स. खांडेकरांनी आपले लेखनगुरू नाटककार रा. ग. गडकरी यांच्या निधनानंतर (२३ जानेवारी, १९१९) पहिल्या स्मृतिदिनी गडकऱ्यांवर एक चरित्रात्मक लेख लिहिला. नंतर वर्षभराने ‘प्रेमसंन्यास'वर लिहिला. दोन्ही लेख वाचकांनी पसंत केले व खांडेकरांनी गडकऱ्यांच्या सर्व वाङ्मयाचे विवेचन करावे, असे सुचविले. त्यानुसार सिद्ध झालेला प्रथम नाट्यविषयक समीक्षाग्रंथ म्हणजे 'गडकरी : व्यक्ती आणि वाङ्मय' (१९३२). यामुळे खांडेकर नाटकाचे अभ्यासक व समीक्षक म्हणून सर्वश्रुत झाले. त्यानंतर त्यांनी मराठीचा नाट्यसंसार' ग्रंथ लिहिला. यात त्यांनी मराठी नाट्यवाङ्मय व रंगभूमीचा आलेख रेखाटला. १९५७ च्या सातारा इथे भरलेल्या नाट्यसंमेलनाचे वि. स. खांडेकर हे अध्यक्ष होते. त्या निमित्ताने केलेले भाषण, डॉ. भालेरावांवरील लेख. रा. ज. देशमुख (प्रकाशक) यांची ‘नियती' शीर्षक टिपणी समाविष्ट करून या ग्रंथाची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. पुढे खांडेकरांनी 'निवडक कोल्हटकर' (१९७२) चे साक्षेपी संपादन केले. त्यात त्यांनी कोल्हटकरांच्या निवडक साहित्याचा नजराणा नाट्यदर्शन, विचारदर्शन, विनोददर्शन अशा त्रिखंडांत सादर केला. यापूर्वी खांडेकरांनी १९३२ मध्ये ग. त्र्यं. माडखोलकर व गं. दे. खानोलकरांच्या सहाय्याने ९२२ पृष्ठांचा ‘कोल्हटकर लेखसंग्रह' शीर्षक बृहत् ग्रंथ मराठी अभ्यासकांना उपलब्ध करून दिला होता. पुढे खांडेकरांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासाठी ‘समग्र कोल्हटकर'चे दोन खंडांत संपादन केले. प्रथम खंड १९७२ साली, तर दुसरा १९७५ साली प्रकाशित झाला. हे खंड म्हणजे 'निवडक कोल्हटकर'ची सुधारित आवृत्तीच होय. मूळ ग्रंथात १८ लेख समाविष्ट करून तो ग्रंथ अद्यतन करण्यात आला होता.
 वि. स. खांडेकर स्वतः नाटककार तर होतेच; पण मराठी नाटक, चित्रपट यांबद्दल त्यांचं सतत वाचन, चिंतन व लेखन होत राहायचं. वेळोवेळी त्यांनी लिहिलेले नाट्यविषयक समीक्षात्मक लेख त्यांच्या ‘वनभोजन' (१९३५), ‘धुंधुर्मास' (१९४०), ‘गोकर्णीची फुले' (१९४४),‘फुले आणि काटे' (१९४४), गोफ आणि गोफण' (१९४६), 'रेषा आणि रंग' (१९६१) व रंग व गंध' (१९६१) मध्ये संग्रहित आहेत. याशिवाय १९२७ ते १९७२ या कालखंडात लिहिलेले; परंतु अद्याप असंकलित राहिलेले काही लेख आहेत. ते वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहेत.

 या समग्र लेखन, संपादनातून वि. स. खांडेकरांची नाटकविषयक दृष्टी व चिंतन स्पष्ट होते. पुढे खांडेकर पटकथा लेखक म्हणून यशस्वी झाले, त्यामागे नाट्यसमीक्षक म्हणून त्यांनी केलेला रियाज उपयोगी ठरला.

वि. स. खांडेकर चरित्र/५५