पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सिनेगीतकार म्हणून वि. स. खांडेकर मराठी चित्रपटसृष्टीत आले सन १९३६ साली. 'छाया' चित्रपटाची त्यांनी पटकथा लिहिली तशी गीतेही. ही परंपरा ‘सूनबाई' (१९६२) चित्रपटापर्यंत चालू राहिली. या काळात त्यांनी १०० चित्रगीते लिहिली त्यातील अधिकांश गीते संकलित करून त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न सिनेगीतकार गंगाधर महांबरे यांनी खांडेकर जन्मशताब्दीनिमित्ताने केला आहे. ही सर्व गीते ऐकत, वाचीत असताना लक्षात येतं की, खांडेकरांनी प्रेक्षकांची मने व्याकुळ करणारी गीते लिहिली. सिनेगीत असल्यानं ती गेय होती हे वेगळं सांगायची गरज नाही. खांडेकरांना अलंकार, छंद, वृत्तांचे चांगले ज्ञान होते, हे या गीतांवरूनही लक्षात येते. त्यांची गीते श्रोत्यांना, प्रेक्षकांना,वाचकांना अंतर्मुख करतात. कथात्मक वा अन्य साहित्याप्रमाणे खांडेकरांच्या गीतांत मांगल्य, पावित्र्य, चारित्र्य, विवेक, ध्येय, सद्भावना इत्यादी भाव भरलेला आढळतो. चित्रपटांतील गीते बहुधा कथेत रंग भरण्यासाठी, चित्रपट रंगतदार होण्यासाठी, तर कधी गंभीर प्रसंगांतून प्रेक्षकांना हलके-फुलके भाव, वातावरणात नेण्यासाठी येत असतात. तशीच खांडेकरांच्या पटकथांत ही गीते येतात. पदे, भावगीते, द्वंद्वगीते, समूहगीते, नृत्यगीते, अभंग इत्यादी प्रकारांच्या रचनांनी खांडेकरांनी आपलं गीतवैविध्य जपलं.‘घरि एकच पणती मिणमिणती'सारखं काव्य, गीत आजही लोकांच्या मनी-मानसी असणं हे त्यांच्यातील यशस्वी गीतकारांचे प्रमाणपत्र म्हणून दाखविता येतं. दादा चांदेकर, हृदयनाथ मंगेशकर, दत्ता डावजेकर, सलील चौधरी यांसारखे संगीतकार खांडेकरांच्या गीतांना लाभले. रत्नप्रभा, इंदिरा वाडकर, सर्व मंगेशकर बंधु-भगिनी हे त्यांच्या गीतांचे गायक होते.
व्यक्ती चरित्रकार

 वि. स. खांडेकरांनी व्यक्तिचरित्रपर लेख, चरित्र आणि व्यक्ती व वाङ्मय असं परिचयपर व समीक्षात्मक लेखनही विपुल प्रमाणात केलं आहे. या लेखनाचा प्रारंभ नवयुग (फेब्रुवारी, १९२०) मध्ये प्रकाशित राम गणेश गडकरी यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रकाशित ‘हा हन्त हत्न' शीर्षक व्यक्तिपरिचय लेखाने झाला. खांडेकरांनी असे ८० हून अधिक व्यक्तिलेख लिहिले. त्यांचे औचित्य स्मरण, गौरव सन्मान मृत्यू, कार्यस्मरण, शताब्दी, अमृतमहोत्सव, षष्ट्यब्दीपूर्ती, मानपत्र, व्यक्तिगत कृतज्ञता इत्यादींचे. असे ते विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, गौरवग्रंथ यांत प्रकाशित होत. यांपैकी काहींचा समावेश त्यांनी गोकर्णीची फुले', 'ते

वि. स. खांडेकर चरित्र/५१