पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनेक समीक्षकांनी मराठी कथेचे अनभिषिक्त सम्राट' म्हणून केला, अशा कथाकाराची पहिली कथा होती तरी कशी, हे जिज्ञासू वाचक, अभ्यासक, संशोधक आणि समीक्षकांनाही कळावे.
 वि. स. खाडेकर पुढे दहा वर्षे विविध नियतकालिकांतून कथा लिहीत राहिले.सन १९२९ मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह ‘नवमल्लिका' प्रकाशित झाला. मल्लिका' म्हणजे जाईचे फूल. अशी नऊ फुले यात होती. ती नवीही होती; म्हणून ‘नवमल्लिका' शीर्षक. यातील कथा अनेक तऱ्हेच्या.खांडेकरांच्याच भाषेत सांगायचं तर,'आजीबाईचा बटवा', ‘बाळगोपाळांचा खिसा’, ‘नऊ धान्याची खिचडी', 'गारुड्याची पोतडी','नवपुष्पांचा हार अगर ‘इंद्रधनुष्य' यांतील कोणतीही पदवी' या कथासंग्रहास देता येईल. ‘नवमल्लिका'कथासंग्रह खांडेकरांनी विद्यार्थी डोळ्यांपुढे ठेवून प्रकाशित केला होता; त्यामुळे या कथासंग्रहातून तरुणांच्या भावना व प्रौढांचे विचार चित्रित करणाऱ्या गोष्टी मुद्दाम वगळण्यात आल्याचे प्रस्तावनेत नमूद आहे. जांभळीची शाळातपासणी'सारखी महत्त्वाची कथा याच संग्रहातील.
 मराठी कथेचा प्रारंभ भाषांतराने झाला असे मानले जाते. सिंहासन बत्तीशी (१८१४), हितोपदेश (१८१५), पंचतंत्र (१८१५), इसापनीती (१८२८), वेताळ पंचविशी (१८३०) या ग्रंथांची सुरस मराठी भाषांतरे आली मग बोधकथा, नीतिकथा आल्या. पाठोपाठ अनेक बखरी प्रकाशित झाल्या; पण अस्सल वा अव्वल मराठी कथा लिहिली ती वि. सी. गुर्जर यांनी. त्या कालखंडात (१९१० ते १९३०) ह. ना. आपटे, कृ. के. गोखले, काशीबाई कानेटकर, गिरिजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के कथा लिहीत. साहित्यसम्राट केळकर, नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, निबंधकार व ‘काळ'कर्ते शि. म. परांजपे, कादंबरीकार वा.म.जोशीही गोष्टी लिहीत. खांडेकरांसमोर ही कथापरंपरा असल्याने त्यांनीही सुरुवातीस गोष्टी लिहिल्या. त्यांचा पिंड शिक्षकाचा असल्याने केवळ मनोरंजन हा त्यांच्या कथालेखनाचा उद्देश कधीच राहिला नाही. रंजकतेबरोबर जीवन चिकित्सा, दृष्टिकोन, मानवी मूल्ये, समाजाचे प्रश्न सर्वांची मोट बांधत ते कथा लिहीत राहिले. त्यांच्यापुढे पांढरपेशा मध्यमवर्ग असायचा; कारण तोच त्या वेळचा वाचक होता. त्यांच्या शबल व सबल दोन्ही गोष्टींची खांडेकरांना जाण होती. हा वर्ग साहित्याद्वारे प्रबुद्ध झाला, तर समाजबदलास वेळ लागणार नाही, याची त्यांना खात्री होती.

 सन १९२६ नंतरचा काळ हा मराठी नियतकालिकांचा सुवर्णकाळ होता. ज्योत्स्ना', 'किर्लोस्कर', 'ध्रुव', 'प्रतिमा', 'यशवंत'सारखी

वि. स. खांडेकर चरित्र/४४