कादंबरी लेखक म्हणून खांडेकर मराठी साहित्यात जवळ-जवळ पाच दशके सक्रिय राहिले. या सातत्यपूर्ण लेखनाने खांडेकरांनी मराठी कादंबरी इतिहासात आपलं युग निर्माण केलं. विचारक म्हणून कादंबरीकार खांडेकर गांधीवादी, समाजवादी सिद्ध होत असले तरी शैलीकार म्हणून ते आदर्शोन्मुख वास्तववादी वाटतात. आलंकारिक भाषा, वैचारिक विवेचन, मध्यमवर्गीय पात्रे घेऊन येणाऱ्या कादंबऱ्या वाचकास केवळ अंतर्मुख करीत नाहीत, तर कृतिशील होण्याची त्या प्रेरणा देतात. पुराणातील मिथकांचा वापर करून वर्तमान संदर्भाना ते जोडण्याचं खांडेकरांचे कौशल्य कलात्मक व भविष्यलक्ष्यी वाटतं. त्यामुळे पिढी घडविण्याचे कार्य त्यांच्या कादंबऱ्या करतात. विशेषतः ‘ययाति'सारखी कादंबरी तर एक चिरंतन विचार घेऊन येत असल्यानं कालजयी वा अमर कृती म्हणून वाचक सर्वेक्षणात अग्रेसर राहते. वि. स. खांडेकरांनी आपल्या या १७ कादंबऱ्यांतून वेळोवेळी मानवी प्रश्नांची जी उकल करण्याचा प्रयत्न केला आहे, तो पाहता लक्षात येते की, त्यांना सतत मनुष्य विकासाचा ध्यास होता. मनोरंजनाऐवजी प्रबोधन, कलेऐवजी जीवन, अलंकारितेऐवजी सुबोधतेचा वेध घेत राहणारे कादंबरीकार खांडेकर विकास व प्रयोगाची नित्य नवी क्षेत्रे व शिखरे पार करताना जेव्हा दिसतात तेव्हा लक्षात येते की निरंतर अस्वस्थता, असमाधान हाच त्यांच्या कादंबरी लेखनाचा स्थायीभाव होता.
कथाकार
वि. स. खांडेकर यांनी सन १९१८ साली ‘घर कुणाचे?' ही गोष्ट लिहून कथाक्षेत्रात पदार्पण केले. ही कथा ऑगस्ट, १९२३ च्या 'महाराष्ट्र साहित्य' मासिकात ‘अंदर की बात राम जाने' सदरात प्रकाशित झाली होती. त्या वेळी कादंबरीसदृश दीर्घकथा (गोष्ट) लिहिण्याचा प्रघात होता. अशी प्रकरणे लिहून पुढे त्यांची एक कादंबरी करण्याचा खांडेकरांचा मनसुबा होता. खांडेकरांनी सन १९२९ पासून मृत्यूपर्यंत (सन १९७६) कथा लिहिल्या. सुमारे ३५ मौलिक कथासंग्रह (द्विरुक्ती गृहीत धरल्यास ४३ कथासंग्रह) (कृपया परिशिष्ट १ (साहित्यसंपदा) पाहावे,) प्रकाशित झाले. सुमारे ३०० कथा खांडेकरांनी लिहिल्या व प्रकाशित केल्या; पण ‘घर कुणाचे' ही पहिली कथा काही कोणत्या संग्रहात येऊ शकली नव्हती. कथेचे ग्रह, या विलंबाचे कारण खांडेकरांनी असं स्पष्ट केले असले तरी तिची ग्रहदशा बदलून मी सन २००३ मध्ये ‘रजत स्मृती पुष्प' प्रकल्पांतर्गत संपादित व प्रकाशित केलेल्या 'भाऊबीज' कथासंग्रहात तिचा आवर्जून समावेश केला आहे, तो एवढ्याचसाठी की, पुढे ज्या खांडेकरांचा उल्लेख