'Passion and compassion must go hand in hand' हे या कादंबरीचे सूत्र आहे. शेखरच्या मृत्यूनं नंदाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. पहिल्या प्रेमाची बळी नंदा पुढे देवदत्तच्या आहारी जाते. सुखाची स्वप्ने पाहते; पण स्वप्नभंगाचं शल्यच तिच्या पदरी येतं. कादंबरीतील वसुंधरा, मोहन, मधुरा, गंगाराम, सावित्री, बापू सर्व वेगवेगळ्या दुःखांचे बळी; कारण ते संकीर्णतेत गुरफटलेले. स्वप्रेम, स्वार्थापेक्षा दुसऱ्याचं दुःख कवटाळणे हीच दोन हृदये, माणसे जोडणारी जवळची वाट आहे, हे ‘अमृतवेल'च्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न खांडेकर करतात. प्रस्तावना नसलेल्या दोन कादंबऱ्यांतील ही एक होय; कारण ही कादंबरी म्हणजेच खांडेकरांच्या विचारधारेची दीर्घ प्रस्तावना होय. मधुसूदन कालेलकरांनी ‘अमृतवेल'चं नाट्यरूपांतर केले होते.
वि. स. खांडेकरांच्या लेखनातील शेवटची कादंबरी म्हणून ‘सोनेरी स्वप्नं भंगलेली' (१९७७)चे महत्त्व आहे. ती अपूर्ण कादंबरी होय. मराठीत ती अपूर्ण असली तरी हिंदीत ती पूर्ण स्वरूपात मी अनुवादित केली आहे. त्यानंतर अशीच अपूर्ण; परंतु पुस्तकरूप न झालेली ‘नवी स्त्री' मी संपादित करून प्रकाशात आणली. खांडेकरांच्या पिढीनं स्वातंत्र्यपूर्व काळात स्वतंत्र भारताची स्वराज्याची सोनेरी स्वप्ने पाहिली होती. स्वातंत्र्यानंतरच्या २५ वर्षांत ती धुळीला मिळाली. त्याचे शल्य, तो स्वप्नभंग खांडेकरांनी नानांच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. पत्र, रूपककथांचा वापर करून ‘सोनेरी स्वप्नं भंगलेली कादंबरी कलात्मक करण्याचा प्रयत्न खांडेकरांनी केला आहे.
{gap}'नवी स्त्री' (१९५०) ही वि. स. खांडेकरांची अपूर्ण रचना असली तरी तिचे स्वरूप पाहता एक पूर्ण ‘स्त्री प्रबोधन गीता' म्हणून तिचे असामान्य महत्त्व आहे. नव्या स्त्रीने कायदा जाणायला हवा. तिने नुसते शिक्षित होऊन भागणार नाही, तिनं सुजाण व्हायला हवं. तिच्या मनाची घडण सामाजिक व्हायला हवी. घरचा परस सोडून तिचे अंगण विस्तारायला हवे. ती बाहुली राहून चालणार नाही. स्त्री पुरुषाप्रमाणे स्वातंत्र्य घेऊन जन्माला आली असताना तिला दुय्यम स्थान, गुलामीचं, बंधनाचं जीवन का? स्त्री पुरुषाची सखी केव्हा होणार? असे प्रश्न व विचार खांडेकरांच्या मनात घोळत असताना लिहिली गेलेली ही कादंबरी आज सहा दशके उलटून गेली तरी प्रस्तुत वाटत राहते, यातच कादंबरीचे महत्त्व सामावलेले आहे. खांडेकरांना ‘दबळे ललित लेखक' म्हणून हिणवणाऱ्या समीक्षकांना ही कादंबरी खांडेकरांच्या क्रांतदर्शी तत्त्वचिंतकाचा पैलू दाखविल.