पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या साऱ्या यशाचं श्रेय जातं,वि. स. खांडेकरांच्या भारतीय मिथकांचे समकालीन संदर्भ शोधून त्याचं गूढ-गंभीर चिंतन व्यक्त करण्याच्या ऋषिपणास. ययाति'ची मूळ कथा महाभारतातील. पुढे ती अनेक पुराणांत आढळते. खांडेकरांनी मूळ कथेत बदल करून ते वर्तमानाशी जोडले. ही 'ययाति'ची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा तर कचाची भक्तिकथा होय. या कथेचा मोह कुसुमाग्रजांना झाला, तसाच तो हिंदीतील प्रसिद्ध कवी कादंबरीकार भगवतीचरण वर्मीनाही. कुसुमाग्रजांनी 'ययाति आणि देवयानी' हे नाटक लिहिलं, तर वर्मांनी ‘चित्रलेखा' कादंबरी. दोन्ही प्रेक्षकांनी, वाचकांनी पसंत केली. तिचं सामर्थ्य मात्र मूळ कथेतच आढळतं.
 यती नि ययाती ही नहूष राजाची मुलं. अगस्त ऋषींच्या शापामुळे त्यांची ताटातूट होते. ययाती शूर, वीर, साहसी, तो भावाच्या शोधार्थ निघतो. प्रवासात त्याची देवयानीशी गाठ पडते. तिच्याशी तो लग्न करतो; पण सुखी नाही होत. सुख त्याला शर्मिष्ठेकडून मिळतं. त्या रागाने देवयानी राणी शर्मिष्ठेला दासी बनवून बंदी बनविते. ययाती तिची सुटका करतो. तेव्हा कच आणि यती तिच्या मदतीला धावून येतात. ययातिपुत्र पुरू मोठा होऊन सर्व विद्यांत प्रवीण होतो. यदूला दस्यूच्या तावडीतून सोडवितो. शुक्राचार्यांच्या शापामुळे जख्ख म्हाताच्या झालेल्या वडिलांना आपलं तारुण्य देतो. आपला भाऊ व आई परत मिळावी म्हणून राज्याचा हक्क सोडतो; पण देवयानी त्याला सिंहासनारूढ करते. अशी कथा असलेली ही कादंबरी कथा म्हणून ती परिचित असली तरी तिचं नवपण कादंबरीत येणाच्या तत्त्वज्ञानात आहे व ते वर्तमान मानवी प्रवृत्तीवर बोट ठेवणारंही! "कामवासना ही अन्नाच्या वासनेइतकीच स्वाभाविक वासना आहे. अन्नाच्या गरजेइतकीच आवश्यक गरज आहे. तिचे मानवी जीवनातील अस्तित्व, तिचे सौंदर्य, तिचे सामर्थ्य ही सर्व मला मान्य आहेत; पण मनुष्याची कुठलीही वासना या स्वरूपातच राहिली, तर तिचे उन्मादात रूपांतर होण्याचा संभव असतो." असं सांगणारी कादंबरी म्हणजे वर्तमानाचं उपनिषदच नव्हे का? म्हणून तर प्रा. नरहर कुरुंदकर म्हणतात, "खांडेकरांची ‘ययाति' ही अशी आधुनिक माणसाच्या नव्या आकांक्षांची कथा आहे." नाट्यरूपांतर, नभोनाट्य, अनुवाद, इत्यादींमुळे ही कादंबरी सर्वदूर पोहोचली.

 यानंतर सन १९६७ मध्ये खांडेकरांनी 'अमृतवेल' लिहिली. तिचेही अनुवाद झाले. टी.व्ही. सीरियलही झाली या कादंबरीवर. प्रेम मानवी जीवनातील अमृतवेल असून नवस्वप्नांचा ध्यास असेल तर ती बहरल्याशिवाय राहत नाही, अशी उमेद ही कादंबरी वाचकांना देते.

वि. स. खांडेकर चरित्र/४१