पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दादासाहेब संस्कृतचे प्राध्यापक असतात. आपली मुलगी सुलोचनाने राजकारणारत भाग घेणे त्यांना पसंत नसते. तिचा मित्र दिनकर समाजकारण, राजकारण करीत तुरुंगात जातो. सुलोचना इकडे भगवंतराव शहाण्यांशी लग्न करते. तुरुंगातून सुटलेला दिनकर शेतकरी संघटना बांधतो. परत त्याला अटक होऊन फाशीची शिक्षा फर्मावली जाते; परंतु भगवंतराव शहाण्यांमुळे त्याला जीवदान मिळते. अशी कथा गुंफत खांडेकर ही कादंबरी आपल्या उद्दिष्टाप्रत पोहोचवितात. राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात सन १९४२ साली लिहिलेल्या या कादंबरीमागे वातावरणाचा असणारा प्रभाव वाचताना स्पष्ट जाणवतो.
 दुसऱ्या महायुद्धानंतर साऱ्या जगाचेच संदर्भ बदलून जातात. युद्धाच्या महाविनाशकारी प्रत्ययाने खांडेकर कथा, पटकथा, संपादन, इत्यादी कार्य करीत राहिले तरी कादंबरीलेखन मात्र थंडावलं. खांडेकर वृद्ध झाले', ‘त्यांची प्रतिभा आटली' अशी आवई उठत राहिली. या सर्वांना उत्तर देत त्यांनी ११ वर्षांनंतर लिहिलेली कादंबरी म्हणजे 'अश्रू'. सन १९५४ ला ती प्रकाशित झाली. या काळात त्यांचं मन अस्वस्थ होतं. त्यातून एक नवा आशावाद, उमेद घेऊन ते लिहिते होतात. भारताच्या संस्कृतीचा वारसा मध्यमवर्गाने जपला असून हाच वर्ग उद्याच्या सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करील, असं सांगणारी ही कादंबरी. ‘अश्रू' एका शिक्षकाची कथा आहे. शंकर सरळमार्गी, कष्टाळू शिक्षक आहे. गरीब विद्याथ्र्यांबद्दल त्याच्या मनात विलक्षण आस्था असते. मूल्यांना सर्वतोपरी मानणारा हा शिक्षक प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवतो. बहिणीच्या लग्नात अडचण येऊनही गैरमार्गास तो जात नाही. कारण त्याला माहीत असते की, सरळ राहिल्यानं श्रीमंत जरी नाही होता आलं, तरी समाधानी मात्र नक्की राहता येतं. केवळ या मूल्यधारणेवर तो तगतो. हे दाखवून खांडेकर पुन्हा एकदा आदर्शवादाचं समर्थन करतात. याच कथेवर ‘दानापानी' या हिंदी चित्रपटाची निर्मिती सन १९५३ मध्ये करण्यात आली होती. अगोदर चित्रपट आला व नंतर कादंबरी.

 'ययाति' हा वि. स. खांडेकरांच्या कादंबरी लेखनकलेचा चरमबिंदू होय. ही कादंबरी त्यांनी १९५९ ला लिहिली. सन १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ही स्थापना होताच राज्य शासनाने मराठी साहित्यातील उत्कृष्ट वाङ्मयीन रचना म्हणून या कादंबरीचा गौरव केला. पाठोपाठ तिला त्याच वर्षाचं साहित्य अकादमी पारितोषिकही लाभलं अन् पुढे सन १९७४ चे भारतीय ज्ञानपीठ पारितोषिक संपादून भारतीय साहित्यातील श्रेष्ठ साहित्यिक कृती म्हणून सन्मान झाला.

वि. स. खांडेकर चरित्र/४०