पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आकर्षक मुखपृष्ठ व शीर्षक लाभलेली ही कादंबरी सन १९४० साली प्रसिद्ध झाली. पहिले प्रेम हेच खरे प्रेम' असे आजवर सर्वांनी सांगितले. स्टीफन स्वाइग असो वा शरच्चंद्र चतर्जी असो! पण खांडेकर मात्र असे मानतात की, पहिल्या प्रेमाला आजवर अवास्तव महत्त्व दिले गेले. हे खरे आहे की, "पहिल्या प्रेमाचा आत्मा सौंदर्य आहे; पण जीवनाला उजळणाऱ्या शांत प्रीतीचा उदय नुसत्या सौंदर्यातून होत नाही. त्या सौंदर्याला सामर्थ्याची नि साधुत्वाची जोड लागते." ही खांडेकरांची चिंतनप्रधान कादंबरी असल्याने कथानक, पात्रे, प्रसंग केवळ निमित्त होतात. पत्र, काव्य, सुभाषितयुक्त भाषा, इत्यादींमुळे ही कादंबरी विषयास अनुकूल अशी रोमँटिक बनविण्याचा खांडेकरांचा प्रयत्न म्हणजे आजवरच्या त्यांच्या कादंबरीलेखनास दिलेला छेद होय.
 वि. स. खांडेकर आता कादंबरीलेखनाचे वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. आता हेच पाहा, ना.'जळलेला मोहर' ही सन १९४१ ची कादंबरी अगोदर त्यांनी तिची काही प्रकरणे 'पारिजातकाची फुले' नावाने पाच भागांत प्रकाशित केली. वाचकांच्या प्रतिक्रिया अजमावून मग ती एकजिनसी लिहिली. मुळात या कादंबरीची प्रेरणा त्यांना पिरंदेदल्लो यांच्या 'सिक्स कॅरॅक्टर इन सर्च ऑफ अॅन ऑथर' या नाटकातून मिळाली. कादंबरीची नायिका कुसुम काव्यवेडी असते. त्या वेडातच ती लग्न करते; पण तिचा पती विसंगत वागणारा निघतो. समाजात वेश्यांचा उद्धार करणारा तिचा नवरा मात्र घरात तिच्याशी तुटक व तुसडा वागतो. त्यामुळे कुसुम वैतागते. इतकी की, पतीने वधू पाहिजे' जाहिरात देऊनही तिच्यावर त्याचा कसलाही परिणाम होत नाही. उलटपक्षी असे लग्न झालेच, तर आपण सुखी होऊ असं कुसुमला वाटणे म्हणजे जीवनातील मोहर जळल्याच्याच पाऊलखुणा नव्हे का? ‘पांढरे ढग'प्रमाणे या कादंबरीचे शीर्षक सूचक व प्रतीकात्मक आहे.

 ‘प्राचीन काळी महर्षी वाल्मीकींची प्रतिभा क्रौंच पक्ष्याच्या क्रीडामग्न जोडप्याला पाहून भग्न झाली होती ना? त्या जोडप्यातील नराचा भिल्लाने वध केलेले पाहून महर्षीनी रागाने त्याला शाप दिला होता ना? भोग आणि त्याग, काव्य आणि कृती, बुद्धी आणि भावना या जोडप्यापैकी, कुणावरही तसा प्रसंग आला तर तुम्ही तेच करा; आणि एक गोष्ट विसरू नका. कालचे शाप शब्दांचे होते, आजचे शाप कृतीचे असले पाहिजे." असे बजावत लिहिलेली ‘क्रौंचवध' कादंबरीची कथा वि. स. खांडेकरांनी सुलोचना व दिनकरभोवती गुंफली आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/३९