पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वि. स. खांडेकरांनी आपल्या कादंबऱ्यांच्या प्रस्तावनांमधून चांभाराचा देव', 'फुलपाखरे', 'वर्षाकाल', ‘नवी स्त्री', 'छाया', 'मत्स्यगंधा', ‘अजिंक्य’, ‘वटपत्रे', 'वानप्रस्थ’, ‘बुद्ध आणि हिटलर', 'शिलालेख', 'तिसरी भूक’, ‘वृंदावन' यांसारख्या अनेक कादंबऱ्यांचे संकल्प जाहीर केले आहेत. पैकी ‘नवी स्त्री' अपूर्ण स्वरूपात मीच संपादित करून प्रकाशात आणली आहे. 'वृंदावन' पूर्ण झाल्याचे संकेत त्यांच्या पत्रलेखनात आढळतात. त्याचे एक प्रकरण ‘सतीच्या घाटावर' प्रकाशित आहे, तर ‘वटपत्रे'ची ११ प्रकरणे वटपत्रेचा मजकूर पत्ररूप असून वैचारिक आहे, कादंबरीचा नाही. खांडेकरांच्या मनात अनेक कथाबीजे, विचार सदैव थैमान घालत असत. म्हणून अनेक लेखसंकल्प ते जाहीर करीत. काही सिद्ध होत, तर काही स्वप्न बनून राहत.
 ‘कांचनमृग' कादंबरीची निर्मिती महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला घोषणेतून झाली. केवळ शहरांचा विकास करणे म्हणजे कांचनमृगामागे धावणे वाटणाच्या खांडेकरांनी या कादंबरीच्या नायकाचे, सुधाकराचे चरित्र त्या अंगाने गुंफले आहे. तो सुखवस्तू, शहरी, गृहस्थ तेथील सुखासीन जीवनाला कंटाळतो आणि खेड्यात जाऊन ग्रामसुधारणा करण्याची धडपड करतो. शाळा काढतो. समाजसेवा करतो; पण तेथील गावगुंड त्याला विरोध करतात, त्रास देतात, तरी तो आपल्या ध्येयवादी निष्ठेवर अटळ राहतो. स्वतः पुनर्विवाह करतो. आदर्श घालून देतो; पण शेवटी आपण मृगजळामागे धावतो आहोत, या विचाराने निराश होतो. आदर्श विचार व व्यवहाराच्या पाठपुराव्यानेच माणसाचा कांचनमृग होणे थांबेल, असा संदेश ही कादंबरी देते. या कादंबरीने एक प्रभावी जीवनसूत्र सांगण्याचा जो प्रयत्न केला, तो आज आठ दशके लोटली तरी चिरंतन वाटतो. खांडेकरांच्या कादंबऱ्यां आजही एकविसाव्या शतकातील नवी पिढी वाचते याचे रहस्य त्यांतील चिंतनगर्भ मूल्यांनाच द्यावे लागेल.

 यानंतर सन १९३४ मध्ये खांडेकरांची ‘दोन ध्रुव' प्रकाशित झाली. खांडेकर सन १९२० मध्ये शिरोड्यास शिक्षक म्हणून गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी कोकणचं दारिद्रय, अज्ञान, विषमता, अंधश्रद्धा पाहिली. सांगली, पुण्याचे आजवर पाहिलेले सुखवस्तू जीवन व हे यांत दोन ध्रुवांचं अंतर असल्याचं त्यांना जाणवले. त्या जाणिवेची निर्मिती म्हणजे ही कादंबरी. ‘एक हळव्या खेडवळ जिवाचा आर्त वाङ्मयीन उद्गार' असे खांडेकरांनी स्वतःचे केलेले वर्णन किती सार्थ आहे, हे कादंबरी वाचताना लक्षात येते. कथानायक रमाकांत सर्वसाधारण असलेल्या वत्सलाशी लग्न करतो.

वि. स. खांडेकर चरित्र/३५