पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकरण दुसरे
समग्र साहित्यिक खांडेकर : अंतरीचे बोल

 वि. स. खांडेकर हे मराठीतील समग्र साहित्यिक होत. त्यांनी वैविध्यपूर्ण आणि विपुल साहित्यलेखन केलं. कथा, कादंबरी, रूपककथा, पटकथा, नाटक, निबंध, लघुनिबंध, कविता, अनुवाद, संपादन, व्यक्तिचित्र, समीक्षा, चरित्र, आत्मचरित्र, पत्र, मुलाखत, वैचारिक लेख, भाषणे, विनोद अशा साहित्याच्या सर्व प्रांतात त्यांनी लेखन केले. असा चतुस्त्र साहित्यिक मराठीत विरळाच म्हणावा लागेल. वि. स. खांडेकरांच्या साहित्याचे जितके अनुवाद भारतीय भाषांत झाले, तितके क्वचितच कुणा मराठी साहित्यिकाचे झाले असावेत. त्या अंगांनी पाहिले तरी भारतीय साहित्यिक होण्याचा सन्मान प्राप्त करणारे मराठी साहित्यिक म्हणूनही वि. स. खांडेकरांचे स्थान आगळं नि असाधारण मानावं लागेल. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी नाटक व पटकथेचा विचार या चरित्रात अन्यत्र आला असल्याने द्विरुक्ती टाळण्याच्या उद्देशाने त्या दोन पैलूंचा अपवाद करून इथे अन्य लेखनसमग्रतेचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. हेतू हाच की, साहित्यिक खांडेकरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा परिचय व्हावा व साहित्याचे स्थूल रूपही लक्षात यावे.

 वि. स. खांडेकरांच्या साहित्यातील वैविध्य व व्यापकता यांचा शोध घेता लक्षात येते की, त्यांचे वाचनही तसेच अष्टावधानी होते. इंग्रजी, संस्कृत, हिंदी, जर्मन, फ्रेंच, इत्यादी साहित्याचे त्यांचे वाचन बहुआयामी होते. वाचनाबरोबर त्यांनी स्वतःचं असं स्वतंत्र चिंतन विकसित केलं होतं. ते माणसातील विषमता, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा यांबाबत सतत चिंतेत असायचे. सर्वस्पर्शी व सर्वंकष समानता हे त्यांचं स्वप्न होतं. बिकट वास्तवांनी सदैव व्यथित हा लेखक, सर्वोदयी समाजाचा त्याला नित्य ध्यास होता.

वि. स. खांडेकर चरित्र/३३