पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनेक विशेषांक, गौरव अंक प्रकाशित झाले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने त्यांना डी. लिट. पदवी प्रदान केली (१९७६), जन्मशताब्दी वर्षात भारत सरकारने १९९८ मध्ये खांडेकरांचे स्मृती तिकीट प्रकाशित केले. १९७५ च्या नागपूर येथे संपन्न पहिल्या विश्व हिंदी संमेलनात भारतीय श्रेष्ठ साहित्यिक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. या नि अशा अनेक घटनांतून वि. स. खांडेकरांचे साहित्यिक श्रेष्ठत्व राजमान्य आणि लोकमान्य झालं.
अंधत्व, वृद्धत्व आणि मृत्यू
 वि. स. खांडेकर बालपणापासूनच कृश होते. सतत ताप इत्यादी विकारांनी ग्रस्त असत. दृष्टी अधू असल्याने बालपणीच चष्मा लागला होता. तरुणपणी हिवतापाने ग्रस्त झाल्याने दीर्घकाळ उपचार व विश्रांतीसाठी बांबुळीला दत्तक बहीण वारणा आक्काबरोबर राहावे लागले होते. पुढे शिरोड्यास शिक्षक असताना ते सर्पदंशाने बेजार झाले होते. रक्तदाबाचा विकारही होता. त्यांच्या पत्रव्यवहारात, लेखात, मुलाखतीत, प्रस्तावनेत त्यांच्या प्रकृति अस्वास्थ्याचे उल्लेख सर्वत्र आढळतात. शिवाय पत्नी व मुलांचे आजारपण होतेच. ही सर्व अडथळ्यांची शर्यत पार करीत वि. स. खांडेकरांनी आपले वाचन, चिंतन, मनन, लेखन, वक्तृत्व, सांस्कृतिक कार्य यांत सातत्य ठेवले. ते त्यांनी या अविचलपणे केले त्यांतून ‘शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन। शब्दें वाटू धन जनलोकां।।' हा तुकारामांचा वस्तुपाठ त्यांचा आचारधर्मच होता हे प्रत्ययास येते.
 सन १९७१ साल संपत आले, तसे उजव्या डोळ्याने जे वाचता यायचे तेही येईनासे झाले. वृद्धत्व आणि अशक्तपणामुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे धोक्याचे होते; पण वाचनच प्राणवायू असलेल्या खांडेकरांना शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. मागच्या ऑपरेशनचा अनुभव काही चांगला नव्हता; पण नाइलाज म्हणून १५ फेब्रुवारी, १९७२ रोजी डॉ. परांजपे यांच्याकडे ऑपरेशन झाले; पण पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढत गेली. डोळा काढण्यावाचून गत्यंतर ठरले नाही अन् जगाला प्रकाश देणारा हा साहित्यऋषी स्वतः मात्र अंधारसोबती झाला. पूर्ण अंधत्व आले.
 तरी वि. स. खांडेकरांनी लेखन, वाचनाची कास सोडली नाही. प्रवास, फिरणे बंद झाले तरी घरी शतपावली चालायची. तशातच त्यांनी १९७५चे कऱ्हाडचे अखिल भारतीय साहित्य संमेलन, ज्ञानपीठ पारितोषिक समारंभ व त्याप्रीत्यर्थ दिल्ली, मुंबई, पुणे, कोल्हापूरचे सत्कार समारंभ त्यांनी केवळ लोकांच्या प्रेमामुळे पेलले.

 ऑगस्ट, १९७६ मध्ये त्यांची प्रकृती वृद्धापकाळामुळे ढासळत गेली.

वि. स. खांडेकर चरित्र/३१