पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारतीय राजकारणातील गांधीयुगाचा काळ हा वि. स. खांडेकरांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व विकसित होण्याचा काळ होता. ज्याला स्थूलमानाने टिळकयुगानंतरचा स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणता येईल, त्या काळात १२ कादंबऱ्या, २० कथासंग्रह, ७ लघुनिबंधसंग्रह, २ रूपककथा संग्रह, ५ लेखसंग्रह, १ व्यक्ती व वाङ्मय, १ चरित्र, १५ पटकथा असे विपुल लेखन करून खांडेकर मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक म्हणून समाजमान्य होते. सन १९३७ साली त्यांच्या 'छाया' बोलपटाच्या कथेस कलकत्ता चित्रपट पत्रकार संघाचं ‘गोहर सुवर्णपदक' लाभले होते. भारतातील चित्रपटसृष्टीचा पहिला पुरस्कार म्हणून त्याचं असाधारण नि ऐतिहासिक महत्त्व असले, त्यांना अनेक साहित्य संमेलनाची अध्यक्षपदं चालून आली असली तरी त्यांच्या साहित्यकृतीस स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण होईपर्यंत मात्र नामांकित असे पुरस्कार लाभले नव्हते. नाही म्हणायला कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्या पत्नी रमाबाई आपटे यांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ ठेवलेले ‘कै. ह. ना. आपटे पारितोषिक' सन १९४२ व १९४३ ला वि. स. खांडेकरांना त्यांच्या ‘क्रौंचवध' कादंबरीस मिळाले होते. ते पारितोषिक स्वीकारावे म्हणून रमाबाईंनी लिहिलेले २६ मे, १९४३ चे पत्र मोठे हृद्य होते. ते त्यांच्या आनंदाश्रमातून लिहिले गेले होते.
 सन १९६० ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. स्वतंत्र मराठी राज्य स्थापनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शासनातर्फे उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली व वि. स. खांडेकरांच्या ‘ययाति' कादंबरीस तो दिला गेला. ययाति' कादंबरी मराठी साहित्याची अभिजात साहित्यकृती म्हणून तिला साहित्य अकादमी (१९६०) व भारतीय ज्ञानपीठ (१९७४) असे पुरस्कार लाभले. मराठी भाषा व साहित्यास पहिले ज्ञानपीठ मिळवून देण्याचे कर्तृत्व वि. स. खांडेकरांचेच. 'ययाति' कादंबरी आजही मराठी वाचकांची पसंती म्हणून धृवपद टिकवून आहे.

 वि. स. खांडेकरांनी मराठीत चतुरस्त्र लेखन केले. त्यांचे साहित्य व चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, गुजराती, कन्नड, मल्याळम, आदी भाषांत अनुवादित झाले. काही साहित्यकृती रशियनसारख्या भाषेतही गेल्या. यामुळे वि. स. खांडेकर केवळ मराठी साहित्यिक न राहता ते भारतीय साहित्यिक झाले. भारतीय ज्ञानपीठ पारितोषिकाने त्यावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी भारत सरकारने सन १९६८ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले. त्याच वर्षी साहित्य अकादमीने साहित्यिक योगदानाची नोंद घेऊन त्यांना ‘महदत्तर सदस्यत्व' (फेलोशिप) बहाल केले. या विविध पुरस्कारांच्या निमित्ताने भारतभर त्यांचे सत्कार व सन्मान झाले. षष्ट्यब्दी गौरव, अमृतमहोत्सव झाले.

वि. स. खांडेकर चरित्र/३०