पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते त्यांना समाजशील पुरोगामी साहित्यिक ठरवतं. खांडेकर बोलके सुधारक नव्हते, तर कृतिशील विचारक होते. दलित विद्यार्थ्यांना घरी ठेवणं, सहभोजन, महर्षी कर्वे यांना न्याय देण्यासाठी ‘माझं बाळ'सारखी पटकथा लिहिणं, स्वतःचं पोरकंपण स्मरून पंढरपूरच्या बालकाश्रमाला नियमित भाऊबीज पाठविणं, दत्तधाम, अमरावतीच्या शिवाजीराव पटवर्धनांना किंवा वरोऱ्याच्या बाबा आमटे यांना आनंदवनास साहाय्य करणं, या सर्वांतून त्यांची कृतिशील सामाजिक बांधीलकी वेळोवेळी सिद्ध झालेलीच आहे. म्हणून शिवाजी विद्यापीठ केवळ डी. लिट्. देऊन न थांबता त्यांच्या जीवनकार्याचं स्मृतिसंग्रहालय उभारतं. असा मान मिळविणारे ते पहिले भारतीय लेखक ठरावेत यातच त्यांचा शिखर सन्मान होय. असं असलं तरी वि. स. खांडेकरांनी आपल्या साहित्यातून कल्पना, मूल्य, आदर्शाचा जो आरसेमहाल कल्पिला, तो सत्यात केव्हाच उतरू शकला नाही. प्रत्येक अभिजात लेखकाच्या प्रतिभेला लाभलेला तो चिरंतन शाप असावा. खांडेकरांचा काळ उलटल्यालाही तीन दशके लोटली. परिस्थिती बदलली तर नाही. हेच पहा ना! अगदी अलीकडे म्हणजे २००६ साली ओव्हान पामुक या तुर्कस्थानी कादंबरीकारास साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं. ते स्वीकारताना केलेल्या भाषणात तोही कबूल करतो, ‘जीवनातील सौंदर्यपूर्ण गोष्टींवर व त्यातील समृद्धता शब्दबद्ध करण्याची प्रक्रिया उल्हासदायक असते म्हणून मी लिहितो; कारण मला एका विशिष्ट ठिकाणावर जायचे असते; पण तिथे मी पोहोचू शकत नाही. स्वप्नातील आभास निर्माण करणाच्या अपशकुनांपासून मला पलायन करायचे असते म्हणून मी लिहितो. सुखी होण्याचा माझा प्रयत्न कधीच सफल झाला नाही; सुखी होण्यासाठी मी लिहितो. लेखकाचं सुखी होणं म्हणजे त्याची स्वप्नं साकारणं असतं; पण तो क्षण त्याच्या कधीच हाती येत नाही. काळ मनाप्रमाणे चंचल असतो. बदल हे शेवरीच्या कापसासारखे मृदू, मुलायम व हवेत उडणारे असतात. त्यांना मुठीत घेऊन बांधता येत नाही व स्थायी करता येत नाही. ‘बदल' या शब्दातच बदल सामावलेला असल्याने त्याचं सापेक्षत्व काळाबरोबर, व्यक्तिनिहाय व निसर्गानुरूप बदलत राहतं. म्हणून एक चरित्र समकाल प्रभावित करतं; पण स्थायित्व त्यास लाभत नाही. हे सृष्टीचं अस्थायित्व नवे विचार, कल्पना व साहित्यरूपी निर्मिती करतं. चरित्र नि चारित्र्य दोन्ही परिवर्तनशील असल्यानं काळ नित्य नव्या चरित्रांची अपेक्षा करीत असतो.

वि. स. खांडेकर चरित्र/१६१