पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 नियतकालिकांतील नियमित लेखनाची फलश्रुती म्हणून नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध संग्रह प्रकाशित झाले. नियमित पुस्तक परीक्षणांनी समीक्षक म्हणूनही मान्यता दिली तरी लौकिक मिळाला तो कथाकार म्हणून. परिणामी चित्रपटसृष्टीत पटकथा लेखक होण्याची संधी मिळाली. कर्मभूमी बदलली. शिरोड्याची जागा कोल्हापूरने घेतली व त्यांच्या प्रतिभेस व्यापक क्षितिज मिळालं.
 मान-सन्मान, पुरस्कार, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, प्रभावी वक्ते, संपादक, अनुवादक अशा यशांच्या कमानी आकाशस्पर्शी झाल्या व ते । साहित्य अकादमी, पद्मभूषण, ज्ञानपीठ इत्यादी सन्मानांनी राष्ट्रीय साहित्यकार झाले. यात त्यांच्या साहित्य व चित्रपटांचा विविधभाषी अवतारांचाही वाटा महत्त्वाचा होता.
 वि. स. खांडेकरांनी साहित्यिक म्हणून पिढ्या घडविण्याचे कार्य केलं. त्या कार्याचं महत्त्व त्यांच्या साहित्याच्या मथितार्थात आहे. खांडेकरांनी मराठी भाषा व साहित्यास पहिले ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून दिल्याबद्दल त्यांचा एक जंगी जाहीर सत्कार कोल्हापुरात झाला होता. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, प्रत्येक शास्त्राचे वेगळे महत्त्व आहे. व्यक्तिशः मी असे मानतो की, शेवटी माणुसकीचे शास्त्र समजल्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. त्याशिवाय लेखकाला आपल्याच अनुभूतीचा अर्थ समजणार नाही. मग तो अभिव्यक्ती कसली करणार? समाजजीवनाच्या आधाराशिवाय सर्व शास्त्रे अधुरी राहतील आणि म्हणून सामाजिक आशय असल्याशिवाय वाङ्मय परिणामकारक होत नाही, चिरस्थायी व अक्षय होत नाही. या व्याख्यानातून त्यांनी खांडेकरांच्या साहित्याचा सामाजिक आशय अधोरेखित करून त्यांचे चिरस्थायित्व व अक्षरसाहित्य म्हणून असलेलं महत्त्व स्पष्ट केलं होतं.

 ज्ञानपीठ पारितोषिक स्वीकारताना केलेल्या भाषणाच्या समारोपात खांडेकर म्हणाले होते, ‘साहित्य केवळ दैहिक दुःखाचं आणि त्याच्या हर्षोल्हासाचं चित्रण करतं; पण वास्तवात त्याच्या प्राणात वसत असलेल्या दीपशिखेला चेतवणं हा त्याचा उद्देश असतो. काळाबरोबर जीवनाची मूल्यंही बदलतात. त्या परिवर्तनाचं स्वागत करणे हे साहित्याचे कर्तव्य आहे आणि युगाप्रमाणे जीवनमूल्यांची स्थापना करणं हेही साहित्यिकाचंच कर्तव्य आहे. यातून त्यांनी विशद केलेली साहित्यविषयक भूमिका म्हणजे आपल्या जीवन व वाङ्मयाचं केलेलं विहंगमावलोकन होय. वि. स. खांडेकरांनी जीवनभर एक विशिष्ट भूमिका, विचारधारा व दृष्टी घेऊन साहित्यलेखन केलं.

वि. स. खांडेकर चरित्र/१६०