पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकरण सहावे
उपसंहार

 एकोणिसाव्या शतकाचा सूर्यास्त होत असताना एका गरीब पुरोहिताच्या घरी वि. स. खांडेकरांचा जन्म झाला. वडील मुन्सफ होते; पण पित्याचे छत्र फार दिवस लाभले नाही. पोरके खांडेकर दत्तक गेले आपल्या काकांना. शिक्षण मिळेल या आशेनं झालेलं दत्तकविधान मृगजळ ठरलं. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील शिक्षण सोडून त्यांना दत्तक गावी सावंतवाडीला परतावं लागलं. प्रकृति अस्वास्थ्यामुळे बांबोळीत वास्तव्य करून स्वास्थ्य लाभ होत असतानाच शिरोड्याच्या ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करण्याची संधी मिळाली. पूर्वीचे मुख्याध्यापक हजर न झाल्याने शिक्षक होण्यास गेलेल्या वि. स. खांडेकरांना मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळावी लागली. केवळ शिकवायचं काम केलं तर खांडेकर कसले? वाचन, साहित्यिक सहवास, राष्ट्रीय आंदोलन, स्वतःची अशी ध्येयवादी दृष्टी, खेड्याचं दैन्य, दारिद्रय, अज्ञान पाहून विफल झालेलं मन या साऱ्यामुळे अभ्यासक्रमापलीकडे विद्यार्थांना बहि:शाल व पाठ्यपुस्तक देता यावं म्हणून अनेकविध उपक्रम खांडेकरांनी केले. व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, स्मृतिदिन, राष्ट्रीय सण-समारंभ,स्नेहसंमेलन, नाटक सर्व केलं. भरीस भर म्हणून शाळाही बांधली. पदरमोड व पंचक्रोशीत पायपीट करून.

 सन १९२० ते १९३५ हा त्यांचा काळ शिक्षक म्हणून जसा महत्वाचा तसा वाचन व्यासंग व लेखन रियाझ म्हणूनही! याच काळात पुणे मुक्कामी आलेला नाटककार गडकरी यांच्याशी त्यांचा संपर्क वृद्धिंगत झाला. साहित्य जसे प्रकाशित होऊ लागले तसा लोकसंपर्क वाढला व लेखक म्हणून मान्यताही वाढत गेली.

वि. स. खांडेकर चरित्र/१५९