पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ओळख स्नेहात बदलली. वाचनातून तयार झालेले सुधारक मन व भोवतालची पारंपरिक वृत्ती व व्यवहाराच्या विसंगतीने खांडेकर सतत बेचैन असत. एकदा त्यांनी या विसंगतीवर बोट ठेवत लिहायचं मनावर घेतले. दरम्यान 'नवयुग' मासिकात प्रकाशित झालेला ग. त्र्यं. माडखोलकर लिखित लेख 'केशवसुतांचा संप्रदाय' खांडेकरांच्या वाचनात आला. त्यात माडखोलकरांनी गोविंदाग्रज (गडकरी) यांच्या ‘दसरा' कवितेवर कोरडे ओढले होते. त्यांचे आरोप खोडून काढणारा एक लेख खांडेकरांनी लिहिला. 'तुतारी वाङ्मय व दसरा' असे त्याचे शीर्षक होते; कारण मूळ लेखात माडखोलकरांनी ‘दसरा कविता म्हणजे केशवसुतांच्या ‘तुतारी'चे अधम ‘अनुकरण' असल्याचे विधान केले होते. लेखासोबत आपली नवरचित कविता ‘होळी', 'आदर्श' या टोपणनावावर पाठविली होती. दोन्ही रचना 'नवयुग'मध्ये प्रकाशित झाल्या. याच दरम्यान बरेच दिवस मनात खदखदत असलेल्या वेगळ्या विसंगतीवर खांडेकरांनी एक लेखमाला लिहायचे ठरवून त्याची पहिली खेप ‘उद्यान' मासिकाकडे धाडली. ती प्रकाशित झाली. मग लेखन, प्रकाशन नित्याचे झाले. ‘उद्यान'चे संपादक ग. वि. कुलकर्णी यांच्या प्रोत्साहनामुळे ‘श्रीमत्कालिपुराण' लेखमाला चांगली चालली. या सदरात प्रकाशित लेख ‘महात्मा बाबा' गाजला, तो सावंतवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबा बाक्रे यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या फिर्यादीमुळे. या प्रकरणाचा एक फायदा झाला. जरी ते लिखाण आदर्श' टोपणनावाने होत असले तरी त्याचे लेखक भटवाडीतील वि. स. खांडेकर होत, हे जगजाहीर होते. या चर्चेने लेखक म्हणून वि. स. खांडेकरांचे नाव सर्वतोमुखी झाले होते.
शिरोड्याच्या शाळेत

 एप्रिल, १९२० ची गोष्ट असेल. सावंतवाडीपासून वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावरील शिरोड्याहून घनश्याम आजगावकर नावाचे शिक्षक एक दिवस वि. स. खांडेकरांच्या भटवाडीतील घरात दत्त झाले. त्यांना एका शिक्षकाची गरज होती. ते शिरोड्याला ‘ट्यूटोरियल इंग्लिश स्कूल चालवित. विशीतला हा तरुण इंग्रजी वाचतो, व्याख्याने देतो,मासिकात लिहितो,हे ते ऐकून होते. तत्पूर्वी खांडेकरांना मालवण, वेंगुर्ल्याहून अशी निमंत्रणं आली होती; पण राष्ट्रीय आंदोलन, लोकमान्य टिळकांचे विचार, राष्ट्रीय शिक्षणाचा ध्येयवाद, इत्यादींमुळे खेड्यात जायचे त्यांनी यापूर्वीच निश्चित केले होते. बाबाकाकांच्या निधनाने सांगलीची वाट बंद झाल्यात जमा होती. तिकडे नाणेलीत जाऊन दत्तक वडील बापूंच्या तडाख्यातून सुटायचे होते. शिरोडे खेडे असल्याची खात्री करून घेतली. आक्का आणि

वि. स. खांडेकर चरित्र/१५