पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समर्पितास बहाल केली जाते... त्या प्रदर्शनातून, अभिव्यक्तीतून समाज पुढे जातो. हे वस्तुसंग्रहालय असं समाज परिवर्तन करणारं, समाज पुढे नेणारं साहित्यतीर्थ... संस्कारतीर्थ!

 वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय सुरू होऊन सात वर्षे झाली. क्षणात प्रभावी प्रसार, प्रचार करणाच्या माध्यमयुगात हरएक प्रयत्न करूनही प्रेक्षकांची संख्या १५००० च्या वरचा आकडा ओलांडू शकली नाही. महाराष्ट्र शासन कोल्हापूर 'तीर्थस्थान' म्हणून विकास करीत आहे. समाजमन संस्कारी, समाजशील, पंचशील व्हावं म्हणून त्यात या संग्रहालयाचा अंतर्भाव नको का व्हायला? 'गुगल'वर नुसतं ‘म्युझियम' शब्द टाइप करा तुम्हाला ‘खांडेकर म्युझियम' भेटणारंच. 'यू ट्यूब'वर सारं खांडेकर म्युझियम आतून एका क्लिकसरशी शांतपणे पाहता येतं. गंमत म्हणजे हे म्युझियम जगातील जितक्या लोकांनी पाहिलं तितकं भारतातील नाही. ही आपली सांस्कृतिक दिवाळखोरीच नव्हे का? कोल्हापुरात रोज सरासरी ५००० पर्यटक येतात... ते काय पाहतात? त्यातून प्रेक्षकांचे चरित्र नोंद होतं. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचं हे काम नाही का? एकट्या ओपल हॉटेलचा अपवाद वगळता 'वर्थ सीन प्लेसीस' म्हणून कुठंही याची नोंद नाही. विद्यापीठांनी पण आक्रमक प्रचारतंत्र, पर्यटन सुविधा म्हणून संग्रहालयाकडे पाहणं, सुट्टीच्या दिवशी ते सुरू राहील अशी व्यवस्था करणं, आपले सर्व विद्यार्थी, प्राध्यापक पाहतील असं तंत्र विकसित करणं, संग्रहालयात खांडेकर साहित्य (ग्रंथ) विक्रीस उपलब्ध करणं, माहितीपत्रकं सचित्र, बहुरंगी करणं, संग्रहालय छायाचित्र संच विक्री केंद्र, खांडेकर तिकिटं, छायाचित्र भेट देणं (सोव्हिनिअर्स) अशी तंत्रे आत्मसात करायला हवी. कँपसवर होणारी चर्चासत्रे, मेळावे यांतील सारे लोक, पाहुणे पाहतील तरी याचा मोठा प्रचार प्रसार होईल. नाभीत नुसता कस्तुरीगंध असून काय उपयोग? वारे निर्माण झाले तरच दरवळ पसरणार ना? 'कस्तुरी कुंडल बसै, मृग ढुँडै बनमाही’, ‘अमृत घट भरले तुझ्या घरी, का वणवण फिरशी बाजारी' हे चित्र बदललं तर महाराष्ट्राचं चरित्र बदलणार! कमलेश्वरांची एक कथा आहे. 'छोटे महाराज'. तो रेवडी विकायचा व्यवसाय करायचा; पण शब्द उच्चारायचा नाही. शेवटी त्यास त्या रेवड्या स्वतःसलाच खाऊन संपवाव्या लागल्या. घोडा फिरवला नाही की अडतो. पान फिरवलं नाही की सडतं. भाकरी फिरवली नाही की करपते. संग्रहालय फिरवलं नाही की बंद करावं लागतं. ते बंद होऊ नये म्हणून भेटा, भेट द्या.

वि. स. खांडेकर चरित्र/१५८