पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 या संग्रहालयाची अशी रचना, मांडणी व सजावट करीत असताना माझ्या मनात ज्या प्रेरणा व दृष्टी होती, तिचा विचार व्हायला हवा. एकविसावं शतक हे आत्मकेंद्री वृत्तीच्या माणसांचं शतक बनत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजमन सतत समाजशील बनविण्याचे आव्हान आपणासमोर आहे, हे लक्षात घेऊन सदरचे वस्तुसंग्रहालय पाहिले की प्रेक्षक त्या विचाराचे होतील असा उभारणीत प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी साधेपणाचे सूत्र सर्वत्र पाळण्यात आले आहे. इथल्या बनावटीत सर्व वस्तू भारतीय निर्मितीच्या वापरण्यात आल्या आहेत. स्वतः वि. स. खांडेकर अत्यंत साधे राहत. महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांतील अनेक नायक, नायिका, पात्रे गांधीवादाचं समर्थन करताना आढळतात. महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्षात (१९६९) वि. स. खांडेकरांनी लिहिलेल्या विविध लेखांचं एक चांगलं पुस्तकच मी संपादित केलं आहे. दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी' त्याचं नाव. ते तुम्ही मिळवून अवश्य वाचा. या गांधीविचारांचा प्रभाव वस्तुसंग्रहालयभर तुम्हांस अनुभवता येईल. सजावटीचं पार्श्व कापड खादीचं, भिंती सारवलेला फिल देणारा, रंगसंगती, मंद प्रकाश, पडवी, कौलं साऱ्यातून ते तुम्ही अनुभवाल. पडवीत एकमेव तसबीर आहे ती महात्मा गांधींची!
 वि. स. खांडेकर पंडित नेहरूंच्या पंचशील तत्त्वाचे भोक्ते होते. स्वातंत्र्य,समता,बंधुता, विज्ञाननिष्ठा व लोकशाही यांचा पुरेपूर उद्गार तुम्हास वस्तुसंग्रहालयात प्रतिध्वनित होत राहतो. मिठाच्या सत्याग्रहाचे छायाचित्र, ऐकवलं जाणारं भाषण, साहित्यग्रंथ, मांडणी, प्रतिसाद व्यवस्था यांतून ही मूल्ये ध्वनित होत राहतात.
 वि.स.खांडेकर समाजवादाचे पाईक होते. या विचाराचे अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या अर्नेस्ट हेमिंग्वे, खलिल जिब्रान, अर्नस् टोलरची छायाचित्रे... त्यांची उपस्थिती सूचक व बोलकी आहे. पत्रातही विनोबांचं प्रतिबिंब... ‘जय जगत्'कडे नेणारं!

 शिक्षकी व्यवसायाचं ‘रोल मॉडेल' खांडेकरांच्या माध्यमातून हे संग्रहालय प्रेरकपणे उभं करतं. ते आजच्या ‘धंदा' होऊ पाहणाऱ्या शिक्षणास संस्कारसाधन बनविल व पोटार्थी होणाऱ्या शिक्षकास ते ध्येयवादी बनवेल तर विद्यार्थ्यांना देशप्रेमी, समाजशील नागरिक! साहित्य वाचकांची अभिरुची रंजकतेकडून अभिजाततेकडे (क्लासिक) वळविण्याचा प्रयत्न इथे आढळेल. खांडेकरांच्या यच्चयावत साहित्यकृतींच्या देखण्या मांडणीचा हाच प्रभाव! पदवी शिक्षणाची मिळते त्यातून? चालतं; पण डी. लिट्.सारखी पदवी वि. स. खांडेकरांसारख्या

वि. स. खांडेकर चरित्र/१५७