पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 साहित्यिक गप्पा रंगत ती गडकऱ्यांची माडी, गडकऱ्यांबरोबर ज्या किर्लोस्कर संगीत थिएटरमध्ये अनेक नाटकं पाहिली ते सारं पाहत आपण गुरुशिष्याचा हृदयंगम संवाद ऐकतो आहोत असा भास होतो. इथंच आपली भेट वि. स. खांडेकरांचे गुरुत्रयी सर्वश्री. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल व कृष्णाजी प्रभाकर तथा काकासाहेब खाडिलकरांशी होते. यांचा वारसा घेऊन खांडेकरांनी ‘संगीत रंकाचे राज्य' नाटक लिहिले होते. जी गोष्ट गुरूंची तीच ग्रंथांचीही. खांडेकरांनी आपल्याला लेखक, साहित्यिक बनविणारे चार ग्रंथ विशद केले होते - ‘अरेबियन नाइट्स' (दहावे ते अठरावे शतक पूर्व), 'रामायण' (दोन हजार वर्षापूर्व), ‘सुदाम्याचे पोहे' (१९१०), आणि शिरोडे (गाव). हे गावही समुद्र, मिठागरे, चर्च इत्यादींनी साकारले आहे. ही चार पुस्तके म्हणजे खांडेकरांच्या साहित्यातील कल्पना, मिथक, विनोद आणि समाजवास्तवाचं मूर्त दर्शन! हे सर्व पाहत प्रेक्षकांना वि. स. खांडेकरांच्या साहित्यिक म्हणून घडण्याची पूर्वपीठिका, संस्कार, सहवास यांची जाणीव होते अन् लक्षात येतं, लेखक असाच नसतो घडत.

 वि. स. खांडेकरांना शालेय वयापासून लिहिण्याचा छंद असला तरी लौकिक अर्थाने ते लेखक झाले सन १९१९ मध्ये. 'नवयुग' मासिकाच्या ऑगस्ट-सप्टेंबर अंकात 'तुतारी वाड्मय व दसरा' (टीकालेख) आणि ‘होळी' (कविता) प्रकाशित होऊन खांडेकर औपचारिकपणे लेखक झाले. थोड्याच दिवसांत कथा, कादंबरी, रूपककथा, लघुनिबंध, नाटक अशी साहित्यिक सप्तपदी घालत लेखक खांडेकरांचा साहित्यिक विकसित झाला. ती सारी सप्तपदी मूळ रूपांत पाहत, वाचीत प्रेक्षक पुढे जातात अन् । ‘शिरोडा पर्व' सुरू होते, सुरू होतो गांधीयुगाचा ओनामा! दत्तक वडिलांच्या हात आखडता घेण्याने खांडेकर फर्गुसनमधील शिक्षण सोडतात आणि ट्युटोरियल इंग्लिश स्कूलचे शिक्षक होणे पसंत करतात. यामागे स्वावलंबनाचा ध्यास असतो. अन् असतो टिळक, आगरकर, गांधींचा ध्येयवाद, राष्ट्रवादही. शिक्षक म्हणून आगमन झाले तरी त्यांची नियुक्ती मात्र हेडमास्तर म्हणून होते. शाळेचे त्रिस्थळी भरणारे वर्ग पाहून खांडेकर पैसाफंड योजना राबवितात. ८० रुपये पगार असताना प्रत्यक्षात हातात पडत ३५-४० रुपये. सन १९२५ साली सुमारे २५००० रुपयांची लोकवर्गणी जमविण्याचा पुरुषार्थ खांडेकर व त्यांचे सहकारी आप्पा नाबर, चं. वि. बावडेकर, शिनारी, दळवी, आजगावकर, प्रभृती करतात ते स्वतःची रु. १००० ची देणगी देऊन. खांडेकरांच्या हस्ताक्षरातील इमारत बांधकामाचा जमाखर्च, शिक्षकांचे हजेरीपत्रक (त्या वेळी मस्टरवर शिक्षक सह्या करीत नसत, तर हेडमास्तर शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रमाणे P,P,P करीत हजेरी मांडत),

वि. स. खांडेकर चरित्र/१५३