पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या दालनात आपण एक पायरी उतरून प्रवेश करतो तेव्हा आपणापुढे उभं ठाकतं एक भव्य भित्तिचित्र(म्युरल). आपण जे संग्रहालय पाहणार असतो त्याची असते ही एक झलक! चित्रकार संजीव संकपाळ व अतुल डाके यांनी जिवाभावाने उभारलेले उठावचित्र म्हणजे खांडेकरांच्या जीवनकार्याचा मौन परंतु बोलका इतिहास. हे भित्तिचित्र आपणास समजावतं... खांडेकरांनी मराठी भाषा व साहित्यास पहिलं ज्ञानपीठ मिळवून देऊन भारतीय भाषांच्या मध्यप्रवाहात आणलं. वि. स. खांडेकरांनी एकीकडे मोरपिसासारखं मनोहारी, मऊ, मुलायम ललित लिहिलं आणि दुसरीकडे मशालीसारखं प्रखर, प्रगल्भ, वैचारिकही. त्यांच्या साहित्यात प्रेम, प्रणय, प्रश्न, प्रहसन (व्यंग, विनोद) सारं आढळतं. खांडेकरांच्या साहित्याचे अनुवाद अनेक भाषांत झालं, खांडेकरांनी अनेक चित्रपट कथा लिहिल्या म्हणून यात फिल्म, कॅमेरा इत्यादी खांडेकरांचं आरंभिक लेखन कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर लाटा, सूर्य, ताडमाड पाहत निरखत झालं. त्याचं प्रतिबिंबही यात पाहण्यास मिळतं. शिवाय खांडेकरांनी माणसाच्या झालेल्या कांचनमृगाची केलेली संभावना व ‘चकोर आणि चातक'च्या प्रतीकातून केलेला माणसाचा झालेला ‘क्रौंचवध'. हे असते ' म्युझियम अॅट एक ग्लान्स.'

 मग सुरू होते एका साहित्यऋषीची जीवनयात्रा! जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा खडतर अखंड प्रवास! वंशवृक्ष, पूर्वज, जन्मघरातून कळते जन्मकथा. बालपण, शिक्षण सांगलीत. सांगली हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. सन १९१३ साली बेळगाव केंद्रातून मुंबई इलाख्यात बारावे, महाराष्ट्रात आठवे, तर बेळगाव केंद्रात दुसरे आलेले गणेश आत्माराम खांडेकर (हे त्यांचं जन्मनाव!) त्यांची चक्क रिझल्ट शीट, एक्झाम रोल पाहत आपण विसाव्या शतकाच्या उदयकाळी पोहोचतो ते कळतही नाही. सन १९१६ साली खांडेकर आपले काका सखाराम खांडेकर यांना दत्तक गेले अन् विष्णू सखाराम खांडेकर (हे त्यांचं दत्तक नाव!) झाले. सावंतवाडीच्या भटवाडीतील ज्या घरात दत्तक समारंभ पार पडला ते घर, त्यांचे दत्तक वडील सावकारी करीत. त्या सावकारीचे दस्त (कागदपत्रे) ठेवण्याची पेटी, दत्तक वडील मोडी लिपीत लिहीत. त्यांच्या हस्ताक्षरातलं पत्र (मराठी भाषांतरासह!) पाहत वाटू लागतं की, दत्तक समारंभ संपन्न होतो आहे नि आपण अक्षता टाकतो आहोत... साक्षीदार म्हणून! वि. स. खांडेकर जेव्हा दत्तक गेले तेव्हा ते फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे शिकत होते. तिथे त्यांची भेट मराठीतील विख्यात नाटककार राम गणेश गडकरी यांच्याशी झाली.

वि. स. खांडेकर चरित्र/१५२