पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘अ’ ते 'ज्ञ' ह्या मराठी भाषेच्या ५२ मातृकांचं प्रतिबिंब म्हणजे वि. स. खांडेकरांचं प्रतिबिंब. त्यात मराठी भाषेचे अलंकार, समास, ध्वनी, स्वर, व्यंजन, व्याकरण, छंद, शब्द, विभक्ती, प्रत्यय, पद, अर्थ, काळ, उच्चार, व्युत्पत्ती... काय नाही सापडत? त्या समग्रतेचं ते प्रतीक! आणि त्याच्याबरोबर समोर स्थानापन्न आहे वि. स. खांडेकरांचा अर्धपुतळा. अर्धपुतळाच का? पूर्णाकृती पुतळा उभारता आला असता; पण आमची धारणा आहे की, वि. स. खांडेकर - व्यक्ती, विचार व साहित्यिक पूर्ण समजून घेणे - येणे अशक्य! त्या आस्वादक अपूर्णतेचं पूर्ण प्रतीक म्हणून अर्धपुतळा. तो कशावर उभा आहे माहीत आहे? पेनाच्या निबेच्या टोकावर; कारण वि. स. खांडेकरी सारं चित्र नि चरित्र उभं आहे लेखणीच्या आधारावर मग आपण प्रत्यक्ष संग्रहालयात प्रवेश करतो ते प्रवेशद्वार दुसरं-तिसरं काही नसून आहे ते प्रचंड बुकशेल्फ! एकीकडे 'ययाति' (श्रेष्ठ कादंबरी) व उ:शाप (श्रेष्ठ कथासंग्रह), तर दुसरीकडे ‘हृदयाची हाक' (पहिली कादंबरी) व 'वन्हि तो चेतवावा' (वैचारिक लेखसंग्रह... संग्रहालय सुरू होतानाचं प्रकाशित शेवटचं पुस्तक.) त्यावरचा ब्लर्ब वाचाल तर तो म्हणजे खांडेकरांच्या साच्या जीवन व विचाराचं बोधामृत! खांडेकरांच्या साहित्याच्या अपरासृष्टीचं ते प्रतिबिंब आपणास पाहायला मिळतं प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना लावलेल्या आरशांमध्ये! तिथं प्रेक्षकांना दिसतात अगणित पुस्तकं नि त्यात प्रेक्षकांचे चेहरेही! ही असते लेखक व वाचकाची गळाभेट, मनोमिलन, अद्वैतता! पुढे दोन भव्य काचेचे दरवाजे आपल्या स्वागताला उभे असतात... त्यांवर दोन मोठी पेन्सिल्सची हँडल्स. क्षणभर ‘सलाऽऽमी शस्त्र'चा पुकारा करीत उभे जणू रक्षकच! हो रक्षकच... कारण इथं वर लावलेत व्हिडिओ कॅमेरे, सेन्सर, गजर आणि बरंच काही. ही असते । आतल्या अमूल्य वारसा, ठेवा, संग्रहाची टेहळणी, सुरक्षा व डोळ्यांत तेल घालून केलेली, घेतलेली काळजी. हँडल्स पेन्सिलीचीच का? तर खांडेकरांना टाक, दौतींनी लिहिण्यापेक्षा पेन्सिलनं लिहिलेलं आवडायचं; कारण का, तर दौतीत टाक बुडवून लिहायला वेळ लागतो, विचार, कल्पनेत खंड पडतो. पेन्सिलने कसं झरझर अखंड लिहिता येतं... विचार, कल्पनेच्या गतीनी. आणि पेन्सिल पण अशी-तशी नाही. ताजमहाल ब्रँड, बव्हेरिया मेड (जर्मन). दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी युद्धग्रस्त होता, पेन्सिलचा कारखाना बंद पडलेला; पण त्यांचे प्रकाशक त्यांना जगातून हुडकून त्या पुरवायचे अन् खांडेकरांचाही तसा हट्ट असायचा.

वि. स. खांडेकर चरित्र/१५१