पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय'चा संकल्पक, संशोधक, संग्राहक म्हणून त्याच्या निर्मितीच्या अनेक प्रेरणा होत्या. शालेय विद्यार्थिवयात मी वि. स. खांडेकरांनीच सुरू केलेल्या आंतरभारती विद्यालय, कोल्हापूरमध्ये शिकलो. त्या काळात खांडेकरांचा सहवास लाभला. त्यांनी आम्हास प्रत्यक्ष शिकवलं. त्यांची अनेक भाषणे ऐकली. अन्य अनेक साहित्यिकांचीपण. महाविद्यालयाच्या शिक्षणकाळात मी त्यांच्या समग्र साहित्याचे वाचन करीत राहिलो. नंतर शिक्षक होऊन त्यांच्याच शाळेत म्हणजे आंतरभारती विद्यालयात शिक्षक झालो. पुढे त्यांच्या कथा, कादंबरी, रूपककथांचे अनुवाद केले. नंतर त्यांच्या समग्र अप्रकाशित साहित्याचं संकलन, संपादन, संस्कार करून २५ पुस्तकांची निर्मिती केली. त्यातही कथासंग्रह, रूपककथा संग्रह, लघुनिबंधसंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, व्यक्तिचित्र संग्रह, आत्मकथनात्मक ग्रंथ, मुलाखत संग्रह, भाषणसंग्रह, पटकथासंग्रह, विनोदी लेखसंग्रह, समीक्षात्मक लेखसंग्रह अशी विविधता व समग्रता होती. यातून माझ्या असे लक्षात आले की, वि. स. खांडेकर केवळ साहित्यिक नव्हते, तर ते विचक्षण असे समाजशिक्षक होते. हे संग्रहालय उभारत असताना अशी भूमिका होती की, ते पाहताना पुढच्या पिढीला लेखनाचं महत्त्व, जीवनात मूल्यांची प्रस्तुतता, सामाजिक समस्यांचं भान येऊन प्रत्येक प्रेक्षक, दर्शक हा समाजशील, विधायक वृत्तीचा, धर्मनिरपेक्ष, वैज्ञानिक दृष्टी धारण करणारा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही निष्ठा मानणारा, साहित्य व भाषाप्रेमी नागरिक घडावा. या स्मृती संग्रहालयाचं अनौपचारिक उद्घाटन आम्ही आंतरभारती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रथम प्रवेशानं केलं. वस्तुसंग्रहालय पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली, “आम्ही लेखक सर्व वाचले. शिक्षकांनी प्रतिक्रिया दिली, “आम्ही शिक्षक असल्याचा आज सार्थ अभिमान वाटला.' साहित्यिक मधू मंगेश कर्णिक म्हणाले होते, ‘आमच्या केशवसुत स्मारकाचं हे पुढचे पण भव्य असं पाऊल आहे. कवी ग्रेस यांनी अंतर्मुख होऊन प्रश्न केला होता, ‘माझं होईल का असं संग्रहालय?' या वेळोवेळच्या साच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद निर्मितीमागील प्रेरणांचीच पोहोच होय.

 वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय हे मराठी साहित्याचे राऊळ आहे. त्याच्या दर्शनीच आपणास मराठी मुळाक्षरांचा अक्षरवृक्ष भेटतो. ते आहे आपल्या मराठी राजभाषा विभागाचं तसं पाहिलं तर बोधचिन्ह; पण ते आपणास भान देतं वि. स. खांडेकरांच्या साहित्याच्या समग्रतेचं!

वि. स. खांडेकर चरित्र/१५०