पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तासही उरले नव्हते. मी अधिकच चिंता व्यक्त केल्यावर त्यांनी मला सायंकाळी घरी भेटायला सांगितले. मी घरी गेलो आणि त्यांनी संग्रहालय स्थापनेचा संचालक म्हणून नियुक्तीचा आदेशच माझ्या हाती दिला. क्षणभर मला खरंच वाटलं नाही. मग मी आणखी एक विनंती केली की, पदभार सोडण्यापूर्वी आपण साधनसंग्रहाचा अनौपचारिक समारंभ करू. त्यांनी होकार दिला. ११ मार्च, २००४ रोजी ते सकाळी ११.०० वाजता पदभार सोडणार होते. १०.०० वाजता त्यांच्या दालनात वि. स. खांडेकरांचं पद्मभूषण प्रशस्तीपत्र व ‘अश्रू' कादंबरीची हस्तलिखित प्रत प्रदान करण्यात आली. ती स्वीकारून त्यांनी पदभार सोडण्याच्या सोहळ्यास जाणे पसंत केले व संग्रहालयास मूर्त स्वरूप आले.हे त्यांच्या वि.स.खांडेकरांविषयीच्या आदरामुळेच घडले होते.
 वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय प्रत्यक्ष साकारले ते मात्र त्यांचे उत्तराधिकारी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुखे यांच्या उदार व धडाडीच्या वृत्तीमुळे. मध्यंतरीच्या काळात संग्रहालय उभारणीस आश्वासन देणाऱ्या काही व्यक्तींच्या गैरसमज, असहकार, कुरापती इत्यादींमुळे संग्रहालय उभारणीपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. कुलगुरू डॉ. साळुखे यांना हे व्हावे असे आजून वाटत होते. मी त्यांना पुरस्कार, मानपत्रे, छायाचित्रे त्या आदींच्या प्रतिकृतींतून हे साकारता येईल असे पटवून दिले. त्यांनी संमती दर्शवताच मी भारतीय ज्ञानपीठ, नवी दिल्ली; साहित्य अकादमी, नवी दिल्ली, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक; ‘वि. स. खांडेकर सचित्र चरित्रपट'चे लेखक जया दडकर, इतिहास संग्राहक सदानंद कदम, तिकीट संग्राहक दत्ता धर्माधिकारी, ‘आकाशवाणी'चे पुराभिलेख संग्रहालय, मुंबई; राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, पुणे; मेहता पब्लिशिंग होऊस, पुणे; विविध मासिके, वृत्तपत्रे, पत्रसंग्राहक इत्यादींशी संपर्क साधून काही मूळ साधने, तर काहींच्या प्रतिकृती बनविल्या. या कामी पं. ना. पोतदार, विजय गजबर, ठेकेदार मनोहर सुतार चित्रकार संजीव संकपाळ, अतुल डाके, संग्रहालयाचे विशेषाधिकारी एम. पी. तथा बाळासाहेब निचिते, प्रभृतींचे जे साहाय्य लाभले ते कधीच विसरू शकणार नाही. या संग्रहालयाची ही खरी शिलेदार मंडळी. पुढे दशकभराच्या कालावधीनंतर खांडेकर कुटुंबीयांनी मूळ पुरस्कार, मानपत्रे, वस्तू इत्यादी उदार अंतःकरणाने प्रदान करून हे संग्रहालय मूळ वस्तूंसह समृद्ध केले. त्यांचेही ऋण अविस्मरणीय म्हणावे लागतील.

 पूर्णरूप आलेले आणि साहित्यप्रेमी विद्यार्थी, साहित्यिक, वाचक, संशोधक, प्राध्यापक, पत्रकार, समीक्षक, संपादकांच्या पसंतीस उतरलेल्या

वि. स. खांडेकर चरित्र/१४९