पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणत खांडेकरांनी या काळात 'मूकनायक', 'सुदाम्याचे पोहे', शेरेडनची नाटके वाचली. मोती तलाव, नरेंद्र डोंगर, चिवार टेकडी, आकेरीचे मेट, मळगावचे मेट ही निसर्गस्थळे खांडेकरांसाठी विरंगुळा बनली. सावंतवाडीच्या श्रीराम वाचनालयात वर्तमानपत्रे, मासिके वाचणे जीवनक्रमाचा भाग होऊन गेला होता. दिवस कंठणे कठीण झाले तरी नाणेली या दत्तक गावाहून सांगावा काही येईना. महिना उलटून गेल्यावर मात्र दत्तक आई व बहिणीचा निर्वाणीचा निरोप आला. नाणेलीस खांडेकरांचे जाणे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखेच होते; पण दत्तक बहीण वारणाआक्काच्या मायेने सारे निभावून जाऊ लागले. तिच्या ‘भाऊ' पुकारणीने खांडेकरांचे पोरकेपण सरले व जीणे सुसह्य होत गेले.
 इच्छेविरुद्ध जगणे, विचार करणे, मन न लागणे या सर्वांची परिणती हिवतापात झाली आणि खांडेकर पुरते गारद झाले. नाणेलीच्या वास्तव्यात इथलं दारिद्रय, अज्ञान, अंधश्रद्धा, इत्यादी गोष्टीही धक्का देणाऱ्या ठरल्या. पुण्याच्या वास्तव्यात थोरामोठ्यांचे सान्निध्य, सहवास लाभल्याले सुधारक मनास हे सारे नवे होते. खेड्याचे हे दर्शन विफल करणारे होते. दारिद्र्यातही चातुर्वर्ण्य आहे. किंबहुना चातुर्वर्ण्यापलीकडचा पंचम वर्ग आहे', या जाणिवेने ते सतत अस्वस्थ असत.
 थोडे बरे वाटताच राहिलेली टर्म पूर्ण करण्याकरिता म्हणून खांडेकर परत पुण्यात आले; पण प्रकृती अस्वास्थ्याने त्यांना परतणे भाग पडले. १९१७,१८ ही दोन वर्षे प्रकृतीच्या कुरबुरीतच गेली. या काळात बांबुळी येथे खांडेकरांचा मुक्काम होता. सोबत दत्तक बहिणीची सावली होती. प्रकृतीस उतार पडावा म्हणून येथील ब्रह्मेश्वर मंदिरात व्रत-वैकल्ये, अनुष्ठाने होत. खांडेकरांचा त्यावर विश्वास नव्हता. केवळ घरच्यांच्या मायेपोटी ते सारे निमूटपणे करीत. १९१८ साल सरता-सरता प्रकृतीत बराच फरक पडला.
साहित्य सृजनारंभ

 सन १९१९ वर्ष उजाडले; पण खांडेकरांचा आराध्य सूर्य मावळला. २३ जानेवारीला राम गणेश गडकरी यांचं दुःखद निधन झाले. खांडेकरांच्या आयुष्यातील पोकळी रोज या ना त्या कारणाने वाढतच निघाली होती. वेळ घालविण्यासाठी परिसरातील मुलांना घरच्या सोप्यावर ते इंग्रजी शिकवू लागले. खांडेकरांनी याच काळात भटवाडीत छोटेसे वाचनालय सुरू केलं. त्यामार्फत सभा, भाषणं असे लुटूपुटूचे समाजकार्य त्यांनी सुरू केले. याच काळात मेघशाम शिरोडकरांसारखा ध्येयवेडा मित्र भेटला.

वि. स. खांडेकर चरित्र/१४