पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खलिल जिब्रान, अर्नेस्ट टोलर, शेले, कीट्स, बायरन, आदी कथाकार, नाटककार, कवी खांडेकरांनी चांगले वाचले होते. खलील जिब्रान, अर्नेस्ट टोलरच्या रूपककथा, पत्रे यांची भाषांतरे ‘सुवर्णकण’, ‘सोनेरी सावल्या', ‘वेचलेली फुले', 'तुरुंगातली पत्रे'च्या रूपांनी उपलब्ध आहेत. दुसरीकडे ‘शाकुंतल', ‘उत्तररामचरित्र', 'शारदा' यांच्या सौंदर्याची खांडेकरांना जाण असते. 'मॅकबेथ', 'हॅम्लेट', ‘प्रॉमिथिअस’, ‘ज्यूलियस सिझर त्यांना माहीत असतो. साहित्यिक श्रेष्ठत्वाच्या पाऊलखुणा चोखळणारे खांडेकर वैश्विक दर्जाचं लेखन करू शकले ते चतुरस्त्र वाचन, व्यासंगामुळे. या साऱ्यांचं एक वैचारिक अधिष्ठान खांडेकरी साहित्याला लाभलेलं असतं. त्यामुळे वाचक आपण एक प्रगल्भ, अभिजात साहित्य वाचतो या भावनेनं खांडेकरांच्या साहित्याकडे गांभीर्याने पाहतो. वाचकांचे खांडेकर वाचन हा शिळोप्याचा उद्योग न राहता वेळेचा सदुपयोग म्हणून जीवनदृष्टी देणारं ठरतं. पूर्वपश्चिम, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, प्राचीन-आधुनिक असा सेतू खांडेकर सतत बांधत एक वैश्विक अभियांत्रिकी रचत जातात. त्यातून वाचक मराठी न राहता भारतीय, जागतिक आपसूकच होतो. “आपणासारिखे करुनि सोडावे सकळजन' हा खांडेकरीय साहित्याचा वस्तुपाठ... त्यातच खांडेकर साहित्याची वाचनीयता, अविस्मरणीयता, अमरता सामावलेली आहे; म्हणून खांडेकर काल वाचले जात होते, आज वाचले जात आहेत, उद्या वाचले जातील ही तर काळ्या दगडावरची रेघ! त्याला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

वि. स. खांडेकर चरित्र/१४५