पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा.' म्हणत जो आचारधर्म पाळतात, तो वाचकांच्या चोखंदळ, चिकित्सक नजरेत चिरंतन बसलेला असतो.
 खांडेकरांचे लघुनिबंध असोत वा रूपककथा. साध्या गोष्टी, प्रसंग, वस्तूतून चिरकालीन सत्य अधोरेखित करण्याचे सामर्थ्य हे खास खांडेकरी म्हणायला हवं. म्हणून त्यांचे साहित्य केवळ मराठीत वाचलं जात नाही, तर समग्र भारतीय भाषांत तिची भाषांतरे आढळतात. सिंधी, पंजाबी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तमिळ, गुजराती, हिंदी, इंग्रजी... कोणत्या भाषेत खांडेकर नाहीत हा संशोधनाचा विषय ठरावा. प्रेमचंद, शरदचंद्र, रवींद्रनाथ यांच्याप्रमाणेच खांडेकरी साहित्य भारतभर वाचलं जातं. विशेष म्हणजे त्या भाषेतही भाषांतरांच्या आवृत्त्या आजही प्रकाशित होतात. तमिळ, गुजरातीत तर खांडेकर त्यांच्या भाषेतीलच लेखक मानले जातात. तमिळ व मराठी वाचकांचा कौल घेतला तर माझी खात्री आहे की, तमिळ भाषिक मते खांडेकरांना अधिक मिळतील. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादराय यांना खांडेकरांच्या कादंबऱ्यांचे उतारेच्या उतारे पाठ होते. त्यांच्या 'द्रविड कळघम', 'द्रविड मुनेत्र कळघम' पक्षाची चळवळ खांडेकर विचारांवर उभी राहिली आहे. तमिळ साहित्य इतिहासात ‘खांडेकर साहित्य युग/अध्याय म्हणून अभ्यासले जाते. खांडेकरांचे तमिळ अनुवादक का. श्री. श्रीनिवासाचार्य तर तमिळमध्ये लेखक म्हणून ओळखले जातात, ते केवळ खांडेकरांच्या भाषांतरामुळे. अशीच परिस्थिती मी गुजरातमध्ये प्रत्यक्ष अनुभवली आहे. सन १९४४ पासून आजअखेर खांडेकर गुजरातीत वाचले जात आहेत. त्यांनाही खांडेकर आपले वाटतात. त्याचं छोटं उदाहरण सांगता येईल. तेथील एक समीक्षक आहेत - डॉ. सुरेश दलाल. त्यांच्या खांडेकरांवरील एका लेखाचंच शीर्षक आहे मुळी ‘मराठी भाषेतील गुजराती कादंबरीकार' तमिळ आणि गुजराती भाषांत खांडेकरांच्या जवळजवळ सर्व कथा, कादंब-या भाषांतरित झाल्या आहेत. श्रीलंका, रशिया, मलेशियामध्ये खांडेकर साहित्यावर संशोधन, समीक्षा आहे. रशियात ‘ययाति' भाषांतरित झाली आहे. देश, प्रदेशाच्या सीमा ओलांडणारं खांडेकरी साहित्य त्या मातीत रुजतं ते त्याच्या वैश्विक सामर्थ्यामुळेच ना?

 वि. स. खांडेकरांनी आपल्या साहित्यातून 'रामायण', 'महाभारत', ‘पुराण' इत्यादींमधील पात्रं घेऊन त्यांची मिथके वर्तमानाशी जोडली. म्हणून प्राचीन व आधुनिकतेचा सेतू निर्माण करणारं हे साहित्य जुन्या, नव्या पिढीस वाचनीय ठरतं. खांडेकर पाश्चात्त्य साहित्याचे व्यासंगी वाचक व अभ्यासक होते. टॉलस्टॉय, स्टीफन झ्वाइग, हेमिंग्वे, शेक्सपीअर,

वि. स. खांडेकर चरित्र/१४४