पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतरच्या एका सत्कारात यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, आमची पिढी खांडेकर साहित्य वाचीत घडली. पिढी घडविण्याचे हे सामर्थ्य केवळ खांडेकरांच्या साहित्यातच नव्हतं, तर व्यक्तिमत्त्वातही होतं. शुद्ध आचरण, नैतिकता, हळवेपणा (याला काहीजण भाबडेपणा म्हणतात) यामुळे खांडेकर अनुकरणीय ठरतात, हे आपणास विसरता येणार नाही. ‘दोन ध्रुव', 'दोन मने'सारख्या कादंबऱ्या म्हणजे खांडेकरांच्या साहित्यिक मनातलं समाजद्वंद्वाचं मूर्त रूप! हिंदूमुस्लिम, दलित-सवर्ण, आस्तिक-नास्तिक, गांधीवाद-मार्क्सवाद, गरीबश्रीमंत या साच्या संघर्षातून आपणास उन्नत, प्रगत, मानव समाज घडवायचा आहे, हे मी तुम्हाला सांगतो' म्हणत खांडेकर ज्या निकराने आपली जीवनदृष्टी वाचकांत उतरवतात, त्यामुळे पिढी घडवण्याचं कार्य त्यांच्या साहित्यातून होत राहतं. मला जे खांडेकरांचं आकर्षण आहे, ते या विधायक सामाजिक अभियांत्रिकीच्या खांडेकरीय खटाटोपाचं. जातींना पुन्हा टोक येण्याच्या वर्तमानकाळात ते बोथट करण्याचे हत्यार परत खांडेकर साहित्यच ठरेल, याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. नवी पिढी ही जातिअंत, निधर्मिता, परधर्मसहिष्णुता, वैश्विकता, स्त्री-पुरुष समानता, आर्थिक समाजवाद मानणारी बनेल, ती केवळ खांडेकर साहित्यावर पोसली तर ‘फिरुनि जन्मेन मी' असं आवर्तनकारी मूल्यबळ नि निष्ठा घेऊन जन्मलेलं हे साहित्य एका बहश्रुत, व्यासंगी, विवेकी लेखकाची हेतुपूर्वक निर्मिती आहे. ‘तेन त्यक्तेन भुजितःचा उपनिषदातील संदेश देणारं साहित्य गांधीवादावर माक्र्सचं कलम करण्याची कल्पना आपल्या कथानक, नायक-नायिका चरित्र, संवादातून व्यक्त करीत राहतं. त्याचा मला लागलेला घोर जागतिकरणातही माणूस यंत्र होणार नाही याचा विश्वास देत राहतं नि म्हणून मी या पुनर्शोधा ... चक्रव्यूहात अडकून राहतो. मला परतीचा मार्ग नकोच आहे.
  हा अमर मानवी प्रतिभेचा शृंगार
  तो उन्मन होता अथवा रचनाकार

 म्हणत कुसुमाग्रजांनी ज्या समाजपुरुषाची कल्पना केली, ते म्हणजे वि. स. खांडेकर! ही प्रतिमा त्यांच्या बहुविध साहित्यातून दिसून येते. त्यांचं ‘रंकाचं राज्य' नाटक म्हणजे राजा जाऊन प्रजा येणं समजावतं. ‘रिकामा देव्हारा' कादंबरीतील सुशीलेचं चरित्र शरच्चंद्रांच्या नायिकांपेक्षा कमी श्रेष्ठ नाही. ‘हिरवा चाफा' कादंबरीचे नायक, नायिका मुकुंद आणि सुलभाची कथा म्हणजे 'स्व'च्या पलीकडे जाऊन 'पर'दुःख आपलं मानण्याचा

वि. स. खांडेकर चरित्र/१४०