पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साधं उत्तर न पाठविणाऱ्या काकांना - एका निर्दयी मनुष्याला आपण दत्तक जाणार, या कल्पनेचे काहूर या युवकाच्या मनात घोंघावत होते. आशानिराशेच्या लपंडावात कळले की, आपण ज्यांना दत्तक जाणार आहोत, त्या सखाराम काकांना १४ अपत्ये झाली होती. एक विधवा मुलगी वारणाक्का वगळता सर्व निवर्तलीत. काका अत्यवस्थ स्थितीत अथरुणाला खिळून आहेत. सावंतवाडीपासून सात-आठ मैलांवर असलेल्या नाणेली गावी त्यांचा मोठा जमीन-जुमला आहे. तो सांभाळण्यासाठी त्यांना वारस हवाय. शिवाय ते अंधश्रद्ध होते. भुताखेतांवर त्यांचा विश्वास होता. आपल्या बोकांडी बसलेला समंध (भूत, पिशाच) उतरायचा तर तरंगांनी (गुरव) सांगितल्याप्रमाणे दत्तकास पर्याय न राहिल्याने ते तयार झाले व दत्तक विधी १३ जानेवारी, १९१६ रोजी सावंतवाडीतील वडिलार्जित घरी पार पडून ते विष्णू सखाराम खांडेकर' झाले.
 दत्तक विधान पूर्ण झाल्यावर खांडेकर पुण्यास शिक्षण घेण्यासाठी म्हणून परतले. परतताना दत्तक वडिलांनी वाटखर्च देण्याचेही औदार्य दाखविले नाही. पुण्यात उतरले तेव्हा टांग्याने जाण्याइतपतही पैसे त्यांच्या खिशात नव्हते. आता त्यांची स्थिती 'न घर का, ना घाट का' अशी उपेक्षित झाली होती. दत्तक वडील स्पष्ट होते. दत्तक मुलानं शिक्षण सोडून शेती, सावकारी पाहावी अशी त्यांची अपेक्षा होती. तिकडे आजोळी आजोबा वृद्ध झाल्याने त्यांचा हात आखडला होता. ते आई व भाऊ शंकरचा सांभाळ करायचे. या जबाबदारीमुळे ते दत्तकपुत्र झाल्याने आजोळी परके झाले होते. आजोळच्या माणसांची अपेक्षा होती की, आता दत्तक घरानं माझं पाहावं.
 खांडेकर विचित्र कात्रीत सापडले होते. दत्तक विधानानंतर परिस्थिती अधिक बिकट झाली. अभ्यासातील लक्ष उडाले. परीक्षेला न बसल्याने टर्म बुडाली. मन रमविण्यासाठी वाचन व नाटक पाहणेच हाती होते. या काळात खांडेकरांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे 'वीरतनय' नाटक पाहिले. योगायोगाने प्रयोगाच्या वेळी गडकरी भेटले. त्यांना खांडेकर परीक्षेला न बसल्याचे कळताच ते रागावले. त्यामुळे खांडेकरांनी पुणे सोडण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी मुंबईमार्गे कोकणात जाणे किफायतशीर होते. भाऊच्या धक्क्यावरून बोटीने ते वेंगुल्यला आले. तेथून सारवट गाडीने त्यांनी सावंतवाडी गाठली.

 दत्तक घरी काकीची- बयावहिनीची हुकुमत चालायची; पण तिने कधी वैरभाव केला नाही. नवे गाव, मित्र नव्हते. 'पुस्तक माझा सखा'

वि. स. खांडेकर चरित्र/१३