पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राज्यातील अनाथ मुलांचे क्रीडा मेळावे भरव. शहरात ग्रंथोत्सव, साहित्य संमेलने, नवलेखक शिबिरे घे. यामागे खांडेकरांचं साहित्य, पात्र, विचार काहीतरी असतंच आणि खरं सांगायचं तर एक द्वंद्व, संघर्ष घोंघावत असतो... खांडेकर माझे बिनभिंतीतील शाळेचे शिक्षक. मला त्याचं साहित्य ‘गैर'शी पंगा घेण्याचं, संभावितांशी हुज्जत घालण्याची प्रेरणा देतं. ते सारखं बजावत राहतं... ‘गैर दुरुस्त होऊ शकतं. दुरुस्त करताना किंमत मोजावी लागते. स्थानांतर करावं लागतं. पदत्याग करावा लागतो; पण 'Wrong can be righted'चा माझा विश्वास रोज दुणावतो. खांडेकरांचं साहित्य वाचकात विवेक जाणवतं. दलित, वंचित, पीडितांप्रती दया, करुणा, सहानुभूतीपलीकडे जाऊन ते तुम्हाला कर्तव्यपरायण, कृतिप्रवण करतं. त्यांचे नायक, नायिका म्हणजे ध्येयवादाचा घोर लागलेली भुतं! मीपण मग निशाचर, भूत होतो. रात्ररात्र खांडेकर वाचीत बसतो. रोज नवं मिळतं. हा माझ्या जीवनाचा आता ‘कॅलिडिओस्कोप झालाय. लोक खासगीत, माघारी ‘याला खांडेकरांनी झपाटलंय', 'समंधाची बाधा झालीय' असं काहीबाही बोलत राहतात. मी ऐकून सुखावतो. माझं तपमान डिग्रीनी अंमळ वधारतंच.

 खांडेकर मला स्टीफन झ्वाइगच्या 'Beware of Pity' वत दयेपासून दूर राहण्याची शिकवण देतात. लोकांची तक्रार असते... याला माणसाळता येत नाही, पाळता येत नाही, गुलाम करता येत नाही. हा हाताला नाही लागत. भरोशाचा गडी नाही. हुकमी मत याचं कधीचं नसतं. नेहमी हा ‘नोटा (Note of Descent, None of the above) चं बटण दाबतो नि एकटा राहतो. व्यवच्छेदक राहणं या काळात अवघड होऊन बसलंय. हा काळ एकतर तुम्ही प्रकाशित रहा' अशी शिकवण देतो. नाही तर तुमच्या मयताला कुत्रंही येणार नाही, असं बजावतो. तरी तुम्ही मूल्यांची लढाई हरता कामा नये याचं बळ खांडेकरी साहित्य देतं. त्याचं सारं साहित्य म्हणजे मूल्यांची पखरणच! नैतिकता, सचोटी, पारदर्शिता, धर्मनिरपेक्षता, विवेक,अंधश्रद्धामुक्तता, जाती अंत जपणं म्हणजे गोळ्या खाऊन मरणं. खांडेकरांचं साहित्य काळाबरोबर बदलण्याचा संदेश देतं. माणसाचा 'ययाति' होऊ न देणं हे त्याचं ध्येय. माणुसकीची ‘अमृतवेल' सुकू नये ही त्याची धडपड. चांभाराचा देव' पुजणारं 'अमृत' पाजावं खांडेकरांनीच. जीवन जगत असताना परिस्थिती माणसास ‘पवित्र पाप' करायला भाग पाडते, समजावणारा त्यांचा ‘छाया' बोलपट असो वा ‘कुमारी मातेचं बाळ माझं बाळ' बनवणारं समाजशिक्षण असो... खांडेकर महात्मा फुले, महर्षी कर्वेचे उत्तराधिकारी बनून पुढे सरसावतात.

वि. स. खांडेकर चरित्र/१३८