पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुस्तके अचर्चित राहतात. ती आपले वाचन मर्यादित असल्याचेच एका परीने सिद्ध करतात. ‘ऋतू न्याहाळणारं पान' (२००८) या खांडेकरांच्या मुलाखतींच्या संग्रहाच्या वाचनातूनही त्यांची साहित्यविषयक भूमिका, साहित्याचे सामर्थ्य व मर्यादा, त्यांच्यावर झालेल्या टीकांना उत्तरे म्हणूनही त्यांचे विवेचन, विश्लेषक महत्त्व नाकारता येणार नाही.मराठी साहित्यसमीक्षेने ललित साहित्य असताही उपेक्षिलेले क्षेत्र म्हणजे पटकथा लेखन. आजच्या प्रसारमाध्यमांच्या युगात त्याचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. चित्रपट, दूरदर्शन सीरियल्स मुळात कथा असतात. त्या संवादरूपात लिहिल्या जातात. त्यांना दृक्-श्राव्य रूपात सादर केले जाते. मराठीत कथा, कादंबरी, नाटकांचे चित्रपट, पटकथा, धारावाहिक कथा होण्याची मोठी परंपरा आहे. मास्टर विनायकांनी वि. स. खांडेकरांना घेऊन सामाजिक, साहित्यिक कृतींवर आधारित चित्रपट निर्मितीची परंपरा सुरू केली. आचार्य अत्रे यात सामील झाले व मराठी चित्रपटांना व्यावसायिक यश लाभलं. नंतर असं यश विजय तेंडुलकरांना लाभलं. अलीकडे विश्वास पाटील असे प्रयत्न करताना दिसतात.

 वि. स. खांडेकरांच्या पटकथांवर मराठी १४, हिंदी १०, तमिळ २, तेलुगू २ असे तब्बल २८ चित्रपट निघाले. भारतीय चित्रपटांना, पटकथांना पुरस्कार देण्याची परंपरा बंगालच्या ‘गोहर मेडल'ने सन १९३६ साली सुरू केली. तेव्हाचे पटकथेचे पहिले ‘गोहर सुवर्णपदक' वि. स. खांडेकरांच्या ‘छाया' या पहिल्या पटकथेने पटकावले होते, हे किती मराठी मने जाणतात? या २८ पटकथांचा संग्रह ‘अंतरीचा दिवा' (२०१२) बाजारात आला आणि काही महिन्यांतच त्याचे पुनर्मुद्रण करणे प्रकाशकाला भाग पडल्याचे मी ऐकून आहे. असा पटकथासंग्रह आचार्य अत्रेच्या ‘चित्रकथा' (१९५८) नावाने प्रकाशित झाला होता; पण पटकथांचा ललित वाङ्मय म्हणून केलेला अभ्यास, संशोधन, समीक्षा विरळाच म्हणावी लागेल. 'अंतरीचा दिवा' पटकथासंग्रहास एक विस्तृत अशी प्रस्तावना असून तीद्वारे यापूर्वीच या ओळीच्या लेखकाने खांडेकरांच्या पटकथांच्या ललित सौंदर्यावर प्रकाश टाकला आहे. मूळ पटकथा वाचनीय तर आहेत; पण मोठ्या कष्टाचे काम ते. यात मला समीक्षकांपेक्षा चित्रपटप्रेमी वाचक आघाडीवर दिसतात. ‘अंतरीचा दिवा'मध्ये 'सोनेरी सावली'ची पटकथा मुद्दाम तांत्रिक अंगाने प्रकाशित केली आहे. माझ्या साहित्यिक उत्खननात ती मला चक्क वि. स. खांडेकरांच्या हस्ताक्षरातच उपलब्ध झाली होती. ती पाहताना माझ्या असे लक्षात आले की, पटकथाकारास चित्रपट निर्मितीचे तंत्रही अवगत

वि. स. खांडेकर चरित्र/१३२