पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/13

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सन १९१५ मध्ये शैक्षणिक वर्षामध्ये बदल करून जानेवारी ते डिसेंबरऐवजी ते जून ते एप्रिल करण्यात आले. त्यामुळे खांडेकरांना सक्तीची सहा महिन्यांची सुट्टी मिळाली. या सुट्टीचा फायदा घेऊन खांडेकरांनी ‘रमणीरत्न' नाटक रचले. सांगलीतील या सुट्टीच्या काळात वासुदेवशास्त्री खरे यांना मिरजेत त्यांच्या घरी हे नाटक यथासांग वाचून दाखविण्यात आले. खरे शास्त्रींचा या नाटकावरचा अभिप्राय बोलका होता. ते म्हणाले, "पोरा, तुझे वय लहान आहे. हे नाटक तू लिहिले यावर नाटकवाले विश्वास ठेवणार नाहीत." या नाटकावर कोल्हटकर, गडकरी यांच्या कोट्यांचा प्रभाव स्पष्ट होता. ते लेखन म्हणजे पूर्वसूरींचं अंधानुकरण होतं. हे नाटक लिहिण्यामागे खांडेकरांचे एक भाबडे स्वप्न होते. नाटक एखाद्या कंपनीला विकायचं व कॉलेज शिक्षणासाठी पैसे जमवायचे; पण खरे शास्त्रींच्या वरील अभिप्रायामुळे ते बासनात गुंडाळून ठेवले गेले.
 जून, १९१५ ला खांडेकरांनी इंटरच्या वर्गासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा; पण त्यांची मनःस्थिती ठीक नव्हती. पैशाची चणचण, नाटकांचे झपाटलेपण, वाचनवेड या सर्वांत विरंगुळा आणि आधार होता तो राम गणेश गडकरी यांच्या सहवासाचा. त्या वेळी गडकरी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. असेच एके दिवशी ते गडकरी यांच्याबरोबर गंधर्व मंडळींच्या बिऱ्हाडी गेले होते. बालगंधर्वांनी गडकऱ्यांच्या सोबत खांडेकरांना पाहून ‘मास्तर, हा बरोबरचा मुलगा कोण?' म्हणून विचारणा केली. तेव्हा गडकरी मास्तर म्हणाले, “हा कोल्हटकरांच्या गादीचा वारस आहे. या वाक्याने खांडेकरांमध्ये साहित्यिक होण्याचे बीजारोपणच झाले.
दत्तक विधान

 अशातच एक दिवस अचानक डिसेंबर, १९१५ मध्ये पोस्टमास्तर असलेल्या मामांची तार खांडेकरांच्या हातात पडली. त्यात लिहिले होते, ‘ताबडतोब निघा. सावंतवाडीला जायचे आहे, दत्तक होण्यासाठी. या तारेने खांडेकर चक्रावून गेले. आपणास न विचारता दत्तकाचा घाट घातल्याबद्दल एकीकडे राग होता, तर दुसरीकडे दत्तकामुळे आर्थिक अरिष्ट संपेल, अशी आशाही होती; पण ते भ्रमात नव्हते. वडिलांच्या जाण्याने आलेल्या पोरक्या जीवनात वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षापासून खांडेरांनी जगात प्रेम, करुणा, सहानुभूती या गोष्टी किती दुर्मीळ असतात, याचा अनुभव घेतला होता. नात्यांच्या रोज ताणत निघालेल्या विणीतून ते आकाशातील कोरडे ढग ओळखून होते. वडील गेल्यानंतर खांडेकरांनी आपल्या काकांना मदतीचे पत्र मामांच्या सांगण्यावरून लिहिले होते. त्याचे

वि. स. खांडेकर चरित्र/१२