पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिवाय लेखकाची अनास्था हेही कारण असावे. वि. स. खांडेकरांचे आज ज्याला आपण विपुल साहित्य म्हणून गौरवितो त्यांच्या संकलन, संपादन, प्रसिद्धी, प्रकाशन, प्रचार, प्रसारात, खांडेकर साहित्याचे तत्कालीन प्रकाशक रा. ज. देशमुखांचे ‘खांडेकर प्रेम' हे एक कारण होते, ते मात्र इतिहासाला नाकारता येणार नाही.
 वि. स. खांडेकरांचे उर्वरित असंकलित, असंपादित, अप्रकाशित साहित्याचे संपादन करण्याच्या इराद्याने मी ते संकलित करण्यास सुरुवात केली आणि ‘रजत स्मृती वर्षी २५ पुस्तके होतील इतके साहित्य वर्षाच्या अविरत मेहनतीतून माझ्या हाती आले. सर्व वर्तमानपत्रे, मासिके, बंद पडलेल्या मासिकांचे जुने अंक जुन्या ग्रंथालयांतून, खांडेकर कुटुंबीयांच्या संग्रहातून, शिवाय खांडेकरप्रेमी, लेखनिक सर्वांकडून विपुल ललित साहित्य हाती आले. सन २००१ सालीच आणि रजत स्मृती दिनीच खांडेकरांचे पहिले स्मृती पुष्प ‘नवी स्त्री' या कादंबरीचे प्रकाशन झाले आणि वि. स. खांडेकरांच्या नवसाहित्याचा, अचर्चित, अस्पर्शित, राहिलेल्या आणि वर्तमान, नव्या पिढीसाठी नव्या साहित्यप्राप्तीचा नवा अध्याय सुरू झाला. गेल्या तपभराच्या काळात १ कादंबरी, ४ कथासंग्रह, १ रूपककथा संग्रह, १ मुलाखत संग्रह, ३ वैचारिक लेखसंग्रह, ४ लघुनिबंध संग्रह २ आत्मकथनात्मक लेखसंग्रह, ३ व्यक्तिलेखसंग्रह अशी २० ललित पुस्तके प्रकाशित झाली. आणखी २ समीक्षा ग्रंथ, १ विनोदी लेखसंग्रह, १ भाषणसंग्रह, २ वैनतेय लेखनखंड, २ कादंबऱ्या, १ प्रस्तावना संग्रह, १ संकीर्ण अशी १२ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. शिवाय ही रोज नवे नवे साहित्य उत्खननात हाती येतच आहे. 'वृंदावन', ‘वटपत्रे', 'पत्रे'ची हस्तलिखिते इथे-तिथे पसरून आहेत. परीक्षणे, प्रस्तावना, समीक्षा तर इतक्या आहेत की कित्ता करता-करता माणूस दमून, संपून जाईल. इतकी खांडेकरांची विपुल साहित्यसृष्टी.

 वि. स. खांडेकरांचे जे प्रचलित, चर्चित ललितसाहित्य आहे त्याबद्दल इतके बोलले, लिहिले, समीक्षिले, संशोधन केले गेले आहे की ते त्याबद्दल लिहिणे म्हणजे शिळ्या कढीला नवा ऊत आणण्यासारखे होईल. मी ज्या ‘अचर्चित ललित साहित्या'बद्दल लिहू पाहतो आहे, तेही लेखन काळाच्या दृष्टीने जुने असले तरी मराठी साहित्य इतिहास, मराठी साहित्य समीक्षा, मराठी साहित्याभ्यास या क्षेत्रात त्यांची नोंद घेण्यात आलेली दिसत नाही. (ही तक्रार नव्हे, वस्तुस्थिती म्हणून त्याकडे पाहण्याच्या दृष्टीने!) जगभर साहित्य संशोधन, समीक्षा, अभ्यास ही निरंतर प्रक्रिया मानली जाते.

वि. स. खांडेकर चरित्र/१२५