पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(उ) वि. स. खांडेकरांचे अचर्चित ललित साहित्य
 वि. स. खांडेकर मराठी साहित्यातील बहुप्रसव लेखक होते. त्यांचे साहित्य त्यांच्या हयातीत तर बहुचर्चित राहिलेच; पण त्यांचे निधन (२ सप्टेंबर, १९७६) होऊन आज सुमारे चार दशके उलटली तरी वाचक ते वाचतात, हे त्यांच्या नित्य नवप्रकाशित आवृत्त्यांवरून लक्षात येते. अन्य भारतीय भाषांत विशेषतः तमिळ, गुजराती, मल्याळम, हिंदी, कन्नड, सिंधी इत्यादींमध्ये खांडेकरांचे विपुल असे ललित साहित्य भाषांतरित झाले आहे. त्यातूनही त्यांच्या साहित्याचे अभिजातपण लक्षात येते. वि. स. खांडेकरांच्या हयातीत १६ कादंबऱ्या, ४० कथासंग्रह, ११ लघुनिबंध संग्रह, ३ रूपक कथासंग्रह, १ नाटक, ५ व्यक्ती व वाङ्मय (चरित्र/ समीक्षा), १ आत्मकथा असे विपुल ललित साहित्य प्रकाशित होऊनही बरेचसे त्यांचे ललित साहित्य असंकलित, अप्रकाशित होते.

 एकविसावे शतक उजाडत असतानाच्या काळात म्हणजे सन २००१ हे साल त्यांचे ‘रजत स्मृतिवर्ष होते. त्यांना निवर्तून २५ वर्षे उलटत असतानाही माझ्यासारख्या वाचकावर त्यांच्या साहित्याचे चढलेले गारूड उतरलेले नव्हते, हे आज त्यानंतरच्या तपभराचा काल उलटूनही माझ्या चांगले लक्षात आहे. विसावे शतक सरत असताना जया दडकर यांनी तयार केलेली ‘वि. स. खांडेकर वाङ्मय सूची' माझ्या हाती लागली. तत्पूर्वी मी त्यांचे ‘एक लेखक आणि खेडे' हे वि. स. खांडेकरांचं पुस्तक वाचलेले होते. माझ्या असे लक्षात आले की, वि. स. खांडेकरांचे बरेच साहित्य असंकलित आहे. हे असंकलित ललित साहित्य ग्रंथरूप का झाले नाही याचा शोध घेता हे स्पष्ट झाले की, त्या काळात जुने साहित्य मिळविणे मोठे कठीण होते. आजच्यासारखे झेरॉक्स तंत्र नव्हते. कित्ता (कॉपी) करायला, उतरवून काढायला माणसे मिळत नसंत.

वि. स. खांडेकर चरित्र/१२४