पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 खांडेकरांच्या पटकथांवर मराठी, हिंदी,तमिळ, तेलुगू भाषांत तब्बल २८ चित्रपटांची निर्मिती झाली होती. भारतीय चित्रपटसृष्टीत पुरस्काराची परंपरा सुरू झाली. सन १९३६ मध्ये. ती सुरू केली ‘कलकत्ता जर्नालिस्ट असोसिएशनने'. त्या वर्षीचे पटकथेचे ‘गोहर सुवर्णपदक' वि. स. खांडेकरांच्या 'छाया' चित्रपटास मिळाले होते. वि. स. खांडेकरांच्या पटकथांवर १४ मराठी, १० हिंदी, २ तमिळ, २ तेलगू चित्रपटांची निर्मिती झाली होती. ‘बड़ी माँ' या हिंदी बोलपटातून लता मंगेशकरांनी हिंदी पार्श्वगायिका म्हणून आपली कारकिर्द सुरू केली. लता मंगेशकरांसह सर्व भावंडांनी चित्रपटसृष्टीतील पहिला अभिनय, ‘स्क्रीन एंट्री' मिळवली, ती वि. स. खांडेकरांच्या 'माझं बाळ' चित्रपटातून. ‘दानापानी' या गाजलेल्या हिंदी चित्रपटाची पटकथा खांडेकरांची होती. त्यात भारतभूषण आणि मीनाकुमारीशिवाय शशी कपूरची भूमिका होती. सन १९५३ हे वि. स. खांडेकरांच्या चित्रपटाच्या दृष्टीने ‘आंतरभारती वर्ष' होतं असं म्हणावं लागेल. त्या वर्षी खांडेकरांचे मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू सर्व भाषांत चित्रपट प्रदर्शित झाले होते.

 वि. स. खांडेकर साहित्यिक म्हणून ‘आंतरभारती' मान्यता मिळवू शकले त्याचे रहस्य शतक उलटले तरी त्याचं साहित्य वाचलं जाण्यात जसं आहे, तसं ते साहित्यातील नैतिकता, मूल्यनिष्ठा, मानवता, गांधीवाद, समाजवाद यांच्या वैचारिक अधिष्ठानाबरोबर भाषासौंदर्य, सुभाषित शैली, अलंकार उपमा आणि रूपक, मिथक, प्रतीकांचा चपखल उपयोग करण्याच्या कलात्मकतेत सामावलेले आहे. त्यांच्या साहित्यात भाव, काव्य, भविष्यदृष्टी यांचा असलेला समन्वय भारतीय संस्कृतीचा स्वर बनून जातो; म्हणून ते सार्वभौमिक भारतीय साहित्यिक बनतात. अशी आंतरभारती प्रतिष्ठा लाभलेले खांडेकर मराठी साहित्यसृष्टीतील अपवादस्वरूप लेखक होत. त्यांच्या या आंतरभारती प्रतिष्ठेची नोंद भारतीय ज्ञानपीठाने बहाल केलेल्या प्रशस्तीपत्रात आवर्जून करण्यात आली आहे. त्यांचं ‘ययाति' कादंबरी असो वा ‘कांचनमृग', त्या मानवास नित्यनूतन जीवनदृष्टी व मूल्यनिष्ठा देत प्रलोभन, पाप, पैसा इत्यादींनी येणाऱ्या स्खलनशीलतेपासून नित्य दूर राहण्याची शिकवण देतात; म्हणून खांडेकर आंतरभारती साहित्यिक ठरतात.

वि. स. खांडेकर चरित्र/१२३