पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 खांडेकरांच्या कथा, कादंबऱ्यांत सुभाषितवजा वाक्ये इतकी प्रभावी असतात की वाचकांना ती अधोरेखित करण्याचा मोह आवरता येत नाही. 'मुंबई समाचार' दैनिकाचे संपादक कै. मिनुभाई देसाई यांनी तर गुजराती भाषांतरित कथा, कादंबऱ्यांतील खांडेकरांची सुभाषिते एकत्रित करून सन १९५३ मध्ये ‘सुवर्ण रेणु' प्रकाशित केले. ते गुजराती वाचकांना इतके भावले की लगेच १९५५ ला प्रकाशकांना त्याची दुसरी आवृत्ती काढणे भाग पडले. तमिळ भाषेप्रमाणेच गुजराती वाचक वि. स. खांडेकरांना आपले वाटतात.
 तमिळ, गुजरातीप्रमाणेच हिंदीतही वि. स. खांडेकरांची विपुल भाषांतरे झाली आहेत. १३ कादंबऱ्या, ७ कथासंग्रह, ३ लघुनिबंधसंग्रह 'ययाति'वर आधारित 'नाटक' हिंदीत उपलब्ध आहे. शिवाय २ रूपक कथासंग्रहांची भाषांतरे झाली आहेत. विशेष म्हणजे खांडेकरांची शेवटची कादंबरी ‘सोनेरी स्वप्ने भंगलेली' मराठीत अपूर्ण आहे; पण खांडेकरांच्या प्राप्त खड्र्याच्या आधारे ती पूर्ण करून मी हिंदीत ‘स्वप्नभंग' शीर्षकाने सन १९८१ मध्ये प्रकाशित केली होती. वि. स. खांडेकरांचे तत्कालीन मराठी प्रकाशक देशमुख आणि कंपनी यांनी तर हिंदीतील खांडेकर वाचकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन हिंदी भाषांतरे प्रकाशित करणारे मराठी प्रकाशक म्हणून लौकिक मिळविला होता. इतकेच नव्हे तर हिंदी वाचकांना खांडेकरांचा आणि त्यांच्या साहित्याचा परिचय करून देणारी २५ पानी पुस्तिका (कॅटलॉग) हिंदीत प्रकाशित केली होती. ही सारी भाषांतरे रा. र. सरवटे यांनी केली होती.
 वरील भाषांशिवाय मल्याळी, कन्नड, इंग्रजी, बंगाली या भाषांत वि. स. खांडेकरांच्या साहित्याची भाषांतरे झाली आहेत. तेलगूमध्ये तर 'ययाति' कादंबरीचा अनुवाद भारताचे माजी भूतपूर्व पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी केला आहे. ते तेलगू भाषिक असून, अस्खलित मराठी बोलत. कराड इथे त्यांनी केलेल्या सन २00३ मध्ये भरलेल्या ७५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना प्रसंगीच्या भाषणातून त्यांचे मराठी वाचन किती प्रगल्भ होते याचा प्रत्यय त्यांनी आणून देऊन मराठी श्रोत्यांना थक्क करून सोडले होते. कोट्यायम (केरळ)चे सुप्रसिद्ध मल्याळी प्रकाशक डी. सी. बुक्स यांनी नरसिंहराव यांचे वरील भाषांतर प्रकाशित केले होते.

 वि. स. खांडेकर केवळ कथा, कादंबरीकार म्हणून आंतरभारती साहित्यिक म्हणून प्रसिद्ध नव्हते; तर भारतीय चित्रपटसृष्टीत पटकथाकार म्हणून त्यांचा लौकिक होता.

वि. स. खांडेकर चरित्र/१२२