पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मराठी व तमिळ भाषेत खांडेकरांच्या परिचयासंबंधी सार्वमत घेतले तर तमिळ भाषिक अधिक संख्येने निघतील, इतके खांडेकरांचे वाचक तमिळमध्ये आढळतात. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सी. एन. अन्नादुराय यांनी सन १९४६ च्या दरम्यान ‘द्रविनाडु' या वृत्तपत्रात खांडेकरांच्या साहित्यातील उतारेच्या उतारे प्रकाशित केले होते. सन १९६५ नंतर तामिळनाडूमध्ये ‘द्रविड कळघम' आणि 'द्रविड़ मुनेत्र कळघम' ही तमिळ अस्मिता चळवळ सुरू झाली. तिचं नेतृत्व सी. एन. अन्नादुराय करत होते. त्या काळात ते आपल्या चळवळीच्या प्रचारार्थ खांडेकरांच्या विचारांचे दाखले मुखोद्गत सादर करीत. त्या चळवळीचं बळ खांडेकरी साहित्य होतं. आजही श्रीलंका, सिंगापूर, मलेशियामध्ये जी तमिळ ज्येष्ठ नागरिकांची पिढी आहे, त्यांची वाचक म्हणून पहिली पसंती खांडेकरच आढळून येते. तमिळमधील श्रेष्ठ कादंबरीकार व समीक्षक डॉ. मु. वरदराजन यांच्या लेखनावर खांडेकर शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे तमिळमध्ये खांडेकर आणि डॉ. मु. वरदराजन यांच्या साहित्याचा तुलनात्मक अभ्यास करणारे संशोधन झाले आहे. तमिळ साहित्यिक पुदुमैप्पित्तन तर एकदा म्हणाले होते की, ‘महाराष्ट्र म्हणजे शिवाजी आणि खांडेकर.' डॉ. मु. वरदराजन मद्रास विद्यापीठाच्या तमिळ भाषा, साहित्य विभागाचे प्रमुख. पुढे ते मदुराई विद्यापीठाचे उपकुलपती झाले. त्या वेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठात आल्यावर वि. स. खांडेकरांची आवर्जून भेट घेतली होती. तामिळनाडूत परतल्यावर त्यांनी ‘कलैमहळ' मासिकात लेख लिहून ‘खांडेकर म्हणजे रूपक-निधी' अशी भलावण केली होती. सन १९४० ते १९५० दशकात तमिळ भाषिकांवर खांडेकरांच्या कथा-कादंबऱ्यांंनी गारूड केलं होतं. त्या काळात तमिळ भाषेत ‘चिरंजीवी' नावाचे मासिक प्रसिद्ध होते. (आता चिरंजीवी अभिनेता प्रसिद्ध आहे तसे!) त्या मासिकावर तत्कालीन मद्रास सरकारने अश्लील साहित्य प्रकाशित केल्याचा आरोप करीत खटला भरला होता. संपादकांनी आपण प्रकाशित केलेले साहित्य अश्लील नसल्याचे सांगत वि. स. खांडेकरांच्या ‘जळलेला मोहर' कादंबरीचा तमिळ अनुवाद ‘कारुगिय मोट्ट' ची प्रत सादर केली. ती ग्राह्य मानून न्यायालयाने संपादकांची निर्दोष मुक्तता केली होती. ‘कलैमहळ' मासिकाचे संपादक आणि विख्यात तमिळ समीक्षक, निबंधकार के. व्ही. जगन्नाथन यांनी तमिळ भाषेत खांडेकरांच्या साहित्यावर विपुल टीकालेखन केले आहे. वि. स. खांडेकरांच्या ‘सुखाचा शोध' कादंबरीचा तमिळ अनुवाद ‘सुगम अँगे' शीर्षकाने प्रसिद्ध झाल्यावर त्याची मोठी चर्चा झाली. मोठा बोलबाला झाला.

वि. स. खांडेकर चरित्र/१२०