पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(ई) वि. स. खांडेकर : आंतरभारती साहित्यिक

 मराठी भाषेस भारताचा ‘आंतरभारती पुरस्कार' मानले जाणारे ‘भारतीय ज्ञानपीठ' प्रथम मिळवून देणाऱ्या वि. स. खांडेकरांची आज ११७वी जयंती आहे. त्यानिमित्ताने वि.स.खांडेकरांचं आंतरभारती साहित्यिक म्हणून असलेलं स्वरूप,योगदान,महत्त्व समजून घेणं प्रसंगोचित होईल. वि. स. खांडेकरांनी मराठीत १७ कादंबऱ्या, ४३ कथासंग्रह, ४ रूपककथा संग्रह, १५ लघुनिबंधसंग्रह,१ प्रस्तावना संग्रह, ११ लेखसंग्रह,४ व्यक्ती आणि वाङ्मय ग्रंथ,४ व्यक्तिचित्रसंग्रह, १ चरित्र,३ आत्मचरित्रे, ४ अनुवाद ग्रंथ, १ पत्रसंग्रह, १ काव्यसंग्रह, ४ भाषणसंग्रह,१ मुलाखत संग्रह, १ नाटक, २५ संपादक ग्रंथ, ५ समीक्षा ग्रंथ,१ पटकथा संग्रह, १ वृत्तपत्र लेखसंग्रह असे सुमारे १५० ग्रंथांचे योगदान देऊन आपल्या साहित्य व लेखणीचं बहुविध व समग्र रूप सिद्ध केले आहे. वरीलपैकी अधिकांश ग्रंथ प्रकाशित असून, काही लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहेत. खांडेकरांच्या वरील साहित्यापैकी काही साहित्य इंग्रजी, हिंदी, तमिळ, मल्याळम, तेलुगू, सिंधी, गुजराती, बंगाली, कन्नड इ. भाषांत अनुवादित झाले असून, त्या अनुवादित भाषांमध्ये खांडेकर त्या भाषेचे साहित्यिक म्हणून ओळखले जातात, हे ऐकून मराठी वाचकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

 उदाहरणच द्यायचं झालं तर तमिळ भाषेचं देता येईल. का. श्री. श्रीनिवासाचार्य हे खांडेकरांचे तमिळ अनुवादक. त्यांनी खांडेकरांच्या जवळजवळ सर्वच कथा-कादंबऱ्यांचे तमिळ भाषेत भाषांतर केले आहे. त्यांना खांडेकरांमुळेच भाषांतरकार असून साहित्यकाराचा सन्मान तमिळ जनतेने दिला. खांडेकरांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर मराठीपेक्षा अधिक उत्साहाने तमिळ जनतेने आनंद उत्सव साजरा केला.

वि. स. खांडेकर चरित्र/११९