पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतरच्या सत्कार समारंभात ते म्हणाले होते की,“सामाजिक आशय असल्याशिवाय वाङ्मय परिणामकारक होत नाही, चिरस्थायी होत नाही,अक्षयही होत नाही..." कला ही जीवनाभिमुख असली पाहिजे, हा विचार ३०-३५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा थोर पुरुष आपल्यापुढे बोलतो आहे... आज एका अर्थाने त्या विचारांना मान्यता प्राप्त झाली आहे. ललित लेखकाजवळ भविष्याचा वेध घेणारी प्रतिभा असली पाहिजे... खांडेकरांच्या रूपाने मराठी साहित्याला ही भविष्यवादी दृष्टी आहे हे स्पष्ट झाले आहे. जर प्रतिभावान लेखकाचे विचार तामिळनाडूच्या माणसाला समजतात, काश्मिरी माणसाला समजतात तर ते जगातील कुठल्याही भाषेतील माणसाला समजणे शक्य आहे. अशा प्रतिभावान लेखकाचे विचार इंग्रजीसारख्या भाषेत मांडले गेले असते तर कदाचित त्यांना 'नोबेल प्राइज' मिळाले असते!

 या सर्व तपशिलांपलीकडे जाऊन मला पुनर्शोधात सापडलेले वि. स. खांडेकर 'माणूस' म्हणून अधिक मोठे वाटतात. ‘ध्वज फडकत ठेवू या' सारखे पुस्तक लिहून त्यांनी दलित व्यथांची तळी उचलली. 'नवी स्त्री'सारखी कादंबरी लिहून आधुनिक स्त्रीचे सुजाणपण अधोरेखित केले. अनेक समाजधुरिणांवर गौरव लेख लिहून त्यांचे जीवन महाराष्ट्राचा आचारधर्म बनविला. आपल्या संवादी वक्तृत्वाने महाराष्ट्रीयांची मनें कृतिप्रवण केली. दृष्टी गमावली तरी साहित्यसाधनेत जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लिहीत राहणारा हा शब्दतपस्वी... त्याने आयुष्यभर वाचन, चिंतन, मनन, लेखन, संवादाची पंचसूत्री अविचल निष्ठेने जपत महाराष्ट्र समाज घडविला. त्याला भले कोणी आलंकारिक, पाल्हाळी लेखक म्हणत राहील; पण त्यांच्या उल्लेखाशिवाय आधुनिक मराठी भाषा व साहित्याचा इतिहास पूर्ण होणार नाही, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य होय; म्हणून वि. स. खांडेकर सार्वकालिक लेखक होत.

वि. स. खांडेकर चरित्र/११८